सोयगाव तालुक्यात सारीचे १२१ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2020 02:18 PM2020-10-02T14:18:46+5:302020-10-02T14:18:46+5:30
माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेत सोयगाव तालुक्यात सारीचे लक्षण असलेले १२१ रुग्ण आढळल्याची खळबळजनक माहिती गुरुवारी तालुका आरोग्य विभागाने दिली असून या रुग्णांवर तातडीने उपचार करण्यात येत आहेत.
सोयगाव : माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेत सोयगाव तालुक्यात सारीचे लक्षण असलेले १२१ रुग्ण आढळल्याची खळबळजनक माहिती गुरुवारी तालुका आरोग्य विभागाने दिली असून या रुग्णांवर तातडीने उपचार करण्यात येत आहेत.
या तपासणी मोहिमेत १ लाख २७ हजार १२७ कुटुंबांपैकी आरोग्य विभागाच्या ८७ पथकांनी पहिल्या टप्प्यात १ लाख सहा हजार ७२७ कुटुंबातील नागरिकांची तपासणी केल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्रीनिवास सोनवणे यांनी दिली. पहिल्या टप्प्यातील २०,४०१ कुटुंबाची तपासणी अजून बाकी आहे. पहिल्याच टप्प्यातील तपासणी मोहिमेत सोयगाव तालुक्यातील बनोटी, जरंडी आणि सावळदबारा या तीनही प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या कार्यक्षेत्रात सारीचे १२१ रुग्ण आढळल्याने औरंगाबाद शहरापाठोपाठ आता ग्रामीण भागातही सारीचा धोका वाढला आहे.
१२१ रुग्ण सारीचे असल्याचे निष्पन्न होताच आरोग्य विभागाकडून या रुग्णांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. यापैकी ७ जणांना सारीसोबतच कोरोनाचा संसर्ग झाल्याचे उघड झाले आहे.
सारीची लागण झालेल्या रुग्णांना सर्दी, ताप आणि खोकला यासोबतच घशात खरखर आदी लक्षणे आढळत असून कोरोनासारखीच लक्षणे अति कमी प्रमाणात सारीच्या रुग्णांमध्ये आहेत.