सावधान! छत्रपती संभाजीनगरात १२२ कॅमेरे टिपताहेत तासाला ५०० बेशिस्त वाहनचालक

By सुमित डोळे | Published: January 30, 2024 01:16 PM2024-01-30T13:16:46+5:302024-01-30T13:24:28+5:30

एआय पद्धतीने पाचव्या सेकंदाला मोबाइलवर दंड

122 cameras capture 500 reckless drivers every hour in Chhatrapati Sambhaji Nagar | सावधान! छत्रपती संभाजीनगरात १२२ कॅमेरे टिपताहेत तासाला ५०० बेशिस्त वाहनचालक

सावधान! छत्रपती संभाजीनगरात १२२ कॅमेरे टिपताहेत तासाला ५०० बेशिस्त वाहनचालक

छत्रपती संभाजीनगर : मान वाकडी करत मोबाइलवर बोलत जाणे, सर्रास उलट दिशेने जाणे, पोलिस दिसताच तिसऱ्याला उतरवून पुढे पुन्हा ट्रिपलसीट दुचाकी दामटणाऱ्यांच्या सर्व पळवाटा आता बंद होणार आहेत. शहरात महत्त्वाच्या १७ चौकांमध्ये तब्बल १२२ एनपीआर कॅमेरे अशा बेशिस्त वाहनचालकांवर लक्ष ठेवतील. भविष्यात लवकरच शहरात स्मार्ट सिटी उपक्रमांतर्गत बसवण्यात आलेल्या सर्व ८५५ कॅमेरे या एनपीआर (ऑटोमॅटिक नंबर प्लेट रिकग्नायझेशन) प्रणालीशी जोडण्यात येतील. विशेष म्हणजे, एका जंक्शनलाही प्रणाली प्रतितास ५०० बेशिस्त वाहनचालक कैद करत आहेत.

२६ जानेवारी रोजी स्मार्ट सिटी उपक्रमांतर्गत या प्रणालीचे उद्घाटन करण्यात आले. पोलिस आयुक्तालयाच्या वाहतूक विभागाच्या ई-चालान प्रणालीला हा प्रयोग जोडण्यात आला आहे. ज्या चौकांमध्ये पोलिस उपस्थित नसतील, कमी प्रमाणात असतील, प्रामुख्याने तेथे या कॅमेऱ्यांद्वारे नियंत्रण करणे सुरू आहे. वाहतूक नियमनासोबतच अपघात करून पळून जाणारी वाहने, मंगळसूत्र चोरी, वाटमारी इ. गुन्ह्यांना देखील यामुळे आळा बसेल.

कशी काम करते एएनपीआर प्रणाली ?
-ऑटोमॅटिक नंबर रिकग्नायझेशन आणि रेड लाईट व्हायोलेशन डिटेक्शन कॅमेरा, अशा दोन प्रकारच्या प्रणालींचा यात समावेश आहे.
- पोलिस आयुक्तालय व मनपाच्या स्मार्ट सिटीच्या सीसीसी (कमांड कंट्रोल सेंटर) मध्ये याचे सर्व्हर कार्यरत असेल.
-१७ जंक्शन (चौक) वर १२२ अद्ययावत कॅमेऱ्यांमध्ये ही प्रणाली संलग्न करण्यात आली आहे.
-याद्वारे कॅमेरे सॉफ्टवेअरद्वारे वाहनाची नंबरप्लेट टिपून सर्व्हरला छायाचित्र, वाहनाच्या सर्व माहितीसह पाठवतात.

पाच कमांड, एआयद्वारे कॅमेरे तुम्हाला पकडणार
-विनाहेल्मेट, सिग्नल मोडणे, झेब्रा क्रॉसिंग, ट्रिपलसीट, उलट दिशेने (राँग साईड) जाणारी वाहने कैद करण्याची कमांड या साॅफ्टवेअरला देण्यात आल्या आहेत.
-त्यानंतर एआय (आर्टिफिशियल इंटिलिजन्स) द्वारे हे १२२ कॅमेरे आपोआप हे नियम मोडणाऱ्या वाहनांना कैद करतील. उदा. उलट दिशेने जाणाऱ्या दंडासाठी सदर चौकातील रस्ते, चौक, मार्ग, त्यांची दिशा व वाहनांची अपेक्षित दिशा अशा कमांडचा समावेश करण्यात आला आहे. एखादे वाहन उलट दिशेने जाताना दिसताच कॅमेरे आपोआप नंबर प्लेटसह छायाचित्र काढणार.

-असे तासाला एका जंक्शनवर तब्बल ५०० छायाचित्र हे कॅमेरे काढतात.
-वाहनाच्या इत्यंभूत माहितीसह सीसीसीमध्ये छायाचित्र उपलब्ध होईल.
-शेवटच्या टप्प्यात पोलिस दंड योग्य वाटल्यास केवळ एकदा क्लिक करतील.
-पुढे ३ ते ५ सेकंदांत वाहनचालकाच्या आरटीओ नोंदणीकृत मोबाइलवर नोटीस प्राप्त होईल.

१३ मीटरपर्यंत नजर
-साऊथ कोरिया कंपनी निर्मित अद्ययावत तंत्रज्ञयुक्त.
-५ मेगापिक्सेल व नाईट व्हिजन कॅमेरे.
-कुठल्याही वातावरणात सक्षमपणे कार्यरत राहतात.
-सिग्नल च्या १३ मीटर अंतरावर कॅमेरे.

सीसीसीचे स्वरुप
-पहिल्या टप्प्यात २० कर्मचारी या प्रणालीचे काम सांभाळतील.
-यात सीसीसीचे ५ तर वाहतूकच्या ५ कर्मचाऱ्यांचा समावेश.
-दोन शिफ्ट ते कार्यरत असतील.
-कार्यालयीन वेळेत तेथूनच हे कर्मचारी माईकद्वारे अनाउंसमेंट करतील. जे ठराविक चाैकात वाहनचालकांना ऐकू जातील.
-३ दिवसांमध्ये २७२ बेशिस्त दुचाकीचालकांना एनपीआरद्वारे दंड ठोठावण्यात आला आहे. यात राँग साईड, सिग्नल मोडणाऱ्या व ट्रिपलसीट वाहनचालकांचे प्रमाण अधिक आहे.

प्रणाली एक, फायदे अनेक
प्रायोगिक तत्त्वावर ५ कमांडवरच सुरू असलेली चाचपणी यशस्वी ठरत आहे. मोठ्या चौकांमध्ये याचा अधिक उपयाेग होतो. उर्वरित कॅमेऱ्यांमध्ये या प्रणालीचा समावेशाचा विचार सुरू आहे.
- शीलवंत नांदेडकर, पोलिस उपायुक्त, वाहतूक विभाग.

Web Title: 122 cameras capture 500 reckless drivers every hour in Chhatrapati Sambhaji Nagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.