घाटी रुग्णालयातील १२३ कर्मचारी बेपत्ता ! कोणी सांगतील का, ते कुठेयत ?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 06:08 PM2022-04-13T18:08:41+5:302022-04-13T18:09:02+5:30
कर्मचारी कागदोपत्रीच, प्रत्यक्षात गायब; परिचारिका संघटनेकडून चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची मोजणी
- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : घाटी रुग्णालयात तब्बल १२३ कायमस्वरूपी चतुर्थ श्रेणी कर्मचारी बेपत्ता आहेत. हे कर्मचारी ज्या ठिकाणी कार्यरत असायला हवेत, तेथे ते नसतात. शासकीय परिचारिका कर्मचारी संघटनेने प्रत्येक वाॅर्डात जाऊन कर्मचाऱ्यांची मोजणी केली. त्यातून हा प्रकार समोर आल्याचा दावा संघटनेने केला आहे. हे कर्मचारी कुठे काम करीत आहेत, असा सवाल आहे, तर रुग्णालय प्रशासनाने असे काही नसल्याचे स्पष्ट केले आहे.
नातेवाईकच स्ट्रेचर ओढतानाचे चित्र घाटीत रोजच पाहायला मिळते. स्ट्रेचर ओढण्याची जबाबदारी ही कर्मचाऱ्यांची आहे; परंतु तसे होताना दिसत नाही. वॉर्डात पुरेसे चतुर्थ श्रेणी कर्मचारी असणे गरजेचे आहे; परंतु तसे नसल्याने अस्वच्छतेसह रुग्ण, नातेवाइकांच्या रोषाला परिचारिकांना सामोरे जावे लागते. या सगळ्यामुळे परिचारिका कर्मचारी संघटनेने स्वत:च कर्मचाऱ्यांची मोजणी केली. तेव्हा कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांबरोबर २७ कंत्राटी कर्मचाऱ्यांचाही हिशोब लागला नाही.
काय आहे दावा ?
परिचारिका संघटनेने ३ दिवस केलेल्या तपासणीत १२३ कर्मचारी आढळले नाहीत. ११३ कंत्राटी कर्मचारी आढळले; तर २७ कर्मचारी कार्यरत नव्हते. बेपत्ता कर्मचारी सुटीवरही नव्हते. ते फक्त कागदोपत्री दाखविले जात असल्याचा दावा संघटनेने केला.
प्रशासनाने कर्मचारी शोधावेत
कायमस्वरूपी १२३ आणि २७ कंत्राटी कर्मचारी पाहणीत दिसले नाहीत. ते कुठे आहेत, त्यांचे वेतन कसे निघते, हे प्रशासनाने शोधले पाहिजे. प्रशासनाने आम्हाला यादी दिली; परंतु आमच्या आणि त्यांच्या यादीत तफावत आहे, असे शासकीय परिचारिका कर्मचारी संघटनेच्या सचिव इंदुमती थोरात म्हणाल्या.
१२ कंत्राटी कर्मचाऱ्यांमागे एक मुकादम कशाला?
घाटी रुग्णालयाने कंत्राटी कर्मचारी घेतले. १२ कंत्राटी कर्मचाऱ्यांमागे एक मुकादम देण्यात आला आहे. हा मुकादम म्हणजे कंत्राटी कर्मचारीच आहे. त्यामुळे हे मुकादम फक्त हजेरी घेण्याचे काम करतात. परिणामी, कामासाठी कर्मचारी अपुरे पडतात. मुकादमाऐवजी या कर्मचाऱ्यांच्या हजेरीचे काम परिचारिकांना देणे शक्य आहे.
- शुभमंगल भक्त, अध्यक्ष, शासकीय परिचारिका कर्मचारी संघटना
प्रशासनाला दाखवून द्यावे
कर्मचारी कार्यरत नाही, असा कोणी आरोप करीत असतील तर ते त्यांनी प्रशासनाला दाखवून दिले पाहिजे. कर्मचाऱ्यांची पडताळणी केलेली आहे. जो आरोप केला जातो, तसे काही दिसत नाही.
- डाॅ. वर्षा रोटे-कागिनाळकर, प्रभारी अधिष्ठाता