बाबा बर्फानीच्या दर्शनासाठी छत्रपती संभाजीनगरातील १,२३५ भाविक सज्ज; डोंगरावर सराव सुरू
By प्रशांत तेलवाडकर | Published: June 20, 2024 07:06 PM2024-06-20T19:06:05+5:302024-06-20T19:06:26+5:30
यंदा २९ जूनपासून अमरनाथ यात्रेला सुरुवात होत आहे. तर १९ ऑगस्टपर्यंत म्हणजे ५२ दिवस यात्रा सुरू राहणार आहे.
छत्रपती संभाजीनगर : दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर यंदा अमरनाथ यात्रेला सुरुवात होत आहे. बाबा बर्फानीच्या दर्शनासाठी मराठवाड्यातून आतापर्यंत १,२३५ भाविकांनी बँकेत आपली नावनोंदणी केली आहे. याशिवाय हजारो लोकांनी ऑनलाइनही नोंदणी केली आहे. हे भाविक दररोज डोंगरावर चढण्याचा व उतरण्याचा सराव करीत आहेत.
यंदा ५२ दिवसांची अमरनाथ यात्रा
यंदा २९ जूनपासून अमरनाथ यात्रेला सुरुवात होत आहे. तर १९ ऑगस्टपर्यंत म्हणजे ५२ दिवस यात्रा सुरू राहणार आहे.
भाविकांना कुठे नोंदणी करावी लागते?
अमरनाथ यात्रेला जाण्यासाठी अमरनाथ श्राइन बोर्डच्या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन फाॅर्म रजिस्ट्रेशन करता येते. तसेच याशिवाय या बोर्डाने जम्मू-काश्मीर बँकेलाही रजिस्ट्रेशनचे अधिकार दिले आहेत.
दोन पैकी एका मार्गाची करावी लागते निवड
अमरनाथ यात्रेला जाण्यासाठी दोन मार्ग आहेत, त्यापैकी एका मार्गाची निवड करावी लागते. शहरातील बँकेत १,२३५ भाविकांनी नावनोंदणी केली आहे. त्यात बालटान मार्गे ५५३ यात्रेकरू व पेहलगाम मार्गे ६८२ यात्रेकरू जाणार आहेत.
शहरातील १५ ग्रुप जातात दरवर्षी अमरनाथ यात्रेला
शहरातील १५ ग्रुप दरवर्षी अमरनाथ यात्रेला जातात. सुमारे १ हजार तरुण भाविक यात सहभागी होतात. यातील बहुतांश ग्रुप ऑनलाइन रजिस्ट्रेशन करतात. यात येथील गोविंदा पथकांचाही समावेश असतो. दरवर्षी नवीन सदस्य यात समावेश होत असतो. सोलापूर-धुळे महामार्गावरील गांधेली ते साताऱ्यापर्यंतच्या डोंगरावर किंवा तसेच गोगाबाबा टेकडी, हनुमान टेकडी, गणेश टेकडी या भागात चढणे व उतरण्याचा सराव केला जात आहे.
बाबा बर्फानी मित्र मंडळाचे यंदा २५वे वर्ष
कोरोना काळातील दोन वर्षे अमरनाथ यात्रा बंद होती. तो अपवाद वगळता शहरातील बाबा बर्फानी मित्रमंडळाने मागील २४ वर्षे अमरनाथ यात्रा यशस्वी पूर्ण केली. यंदा यात्रेला जाण्याचे २५वे वर्ष आहे. या मंडळात हातगाडीवाल्यापासून ते व्यापारी, उद्योजक, पोलिस उपनिरीक्षक, डॉक्टर, वकील, अशा २९ जणांचा समावेश आहे. ५ जुलैला मंडळ अमरनाथ यात्रेसाठी शहरातून रवाना होणार आहे, अशी माहिती मंडळाचे प्रमुख रोशन पिपाडा यांनी दिली.