छत्रपती संभाजीनगरात खर्चाच्या तुलनेत पाणीपुरवठ्यात दरवर्षी १२५ कोटींची तूट
By मुजीब देवणीकर | Published: December 22, 2023 06:39 PM2023-12-22T18:39:22+5:302023-12-22T18:40:15+5:30
देखभाल-दुरुस्ती, वीजबिल, पाणी शुद्ध करण्यासाठी वापरण्यात येणारे केमिकल, ब्लिचिंग पावडर हा सर्व खर्च गृहीत धरला, तर दरवर्षी १५० कोटी रुपये पाणीपुरवठ्यावर खर्च होत आहेत.
छत्रपती संभाजीनगर : शहरातील जवळपास १४ लाखांहून अधिक नागरिकांची तहान भागविण्यासाठी दरवर्षी तब्बल १५० कोटी रुपये खर्च करावे लागतात. खर्चाच्या तुलनेत १२५ कोटींची किमान तूट सहन करावी लागते. दोन वर्षांपूर्वी पाणीपट्टी खूप जास्त होत असल्यामुळे महापालिकेने ४ हजार ५० वरून पाणीपट्टी २ हजार रुपयांवर आणली. त्यानंतरही नागरिकांकडून प्रतिसाद नाही. फेब्रवारी २०२४ मध्ये ९०० मिमी व्यासाची स्वतंत्र जलवाहिनी सुरू होईल. या योजनेचा वार्षिक खर्च किमान ५० कोटीने वाढणार आहे. त्यानंतर डिसेंबरमध्ये नवीन पाणीपुरवठा योजना सुरू झाल्यास खर्च १३८ कोटींपर्यंत जाणार आहे.
देखभाल-दुरुस्ती, वीजबिल, पाणी शुद्ध करण्यासाठी वापरण्यात येणारे केमिकल, ब्लिचिंग पावडर हा सर्व खर्च गृहीत धरला, तर दरवर्षी १५० कोटी रुपये पाणीपुरवठ्यावर खर्च होत आहेत. या तुलनेत पाणीपट्टी वसुली जेमतेम २५ ते ३० कोटी होते. १२५ कोटींची तूट प्रशासनाला सहन करावी लागते. दोन महिन्यांनंतर जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत ९०० मिमी व्यासाची जलवाहिनी सुरू होणार आहे. जुन्या तिन्ही योजना सुरू ठेवल्या तर खर्च ३०० कोटींपर्यंत जाईल.
पाणीपट्टी वसुलीचे आकडे
वर्षे------------वसुली कोटीत
२०१८-१९------२६.२६
२०१९-२०------२९.२९
२०२०-२१-------२९.०६
२०२१-२२-------३७.५३
२०२२-२३--------२५.८२
२०२३-२४--------१५.२८ (१८ डिसेंबरपर्यंत)
पाणीपट्टी अर्ध्यावर; तरी वसुली नाही
समांतर जलवाहिनी योजनेसाठी महापालिकेने पाणीपट्टी ४ हजार ५० रुपये केली होती. राज्यात सर्वाधिक पाणीपट्टी छत्रपती संभाजीनगर महापालिकेची असल्याची ओरड होऊ लागली. त्यामुळे प्रशासनाने २०२२ मध्ये पाणीपट्टी अर्ध्यावर म्हणजेच, २ हजार रुपये केली. त्यानंतरही नागरिक पाणीपट्टी भरायला तयार नाहीत.
सर्वसामान्य नागरिकांचा रोष
महापालिकेने खंडपीठात लेखी स्वरूपात प्रत्येक वसाहतीला पाचव्या दिवशी पाणी देण्याचे आश्वासन दिले. हे वेळापत्रक पाळले जात नाही. आठवड्यातून एकदाच नागरिकांना पाणी मिळते.
नळांना मीटर बसविण्याची योजना
नवीन पाणीपुरवठा योजनेचा खर्च २७४० कोटी आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी खर्च केल्यानंतर, प्रत्येक नळाला मीटर बसवा, असे योजनेत म्हटले आहे. अद्याप तरी मीटर कोण बसविणार, हे उघड नाही. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण २४ तास ७ दिवस पाणी मिळेल, असा दावा करीत आहे. त्यासाठी मीटर बंधनकारक असल्याचे प्राधिकरणचे म्हणणे आहे.
खर्चाचे अंदाजपत्रक तयार
नवीन पाणीपुरवठा योजना पूर्णपणे राबविण्यासाठी वीज, केमिकल, कर्मचारी हा खर्च गृहीत धरला आहे. दरवर्षी १३८ कोटी रुपये खर्च राहील.
- दीपक काेळी, कार्यकारी अभियंता, मजीप्रा.