औरंगाबादेत मालवाहतूकदारांच्या संपामुळे १२५ कोटींचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 12:39 AM2018-07-26T00:39:51+5:302018-07-26T00:41:48+5:30
ट्रान्स्पोर्ट व्यावसायिकांच्या संपाने जिल्ह्यातील उद्योगाला सुमारे १२५ कोटींचा फटका बसला आहे. कच्चामाल उपलब्ध होत नसल्याने कंपन्यांतील यंत्रांचाच ‘चक्का जाम’ होत आहे.
संतोष हिरेमठ ।
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : ट्रान्स्पोर्ट व्यावसायिकांच्या संपाने जिल्ह्यातील उद्योगाला सुमारे १२५ कोटींचा फटका बसला आहे. कच्चामाल उपलब्ध होत नसल्याने कंपन्यांतील यंत्रांचाच ‘चक्का जाम’ होत आहे.
वाळूज, चिकलठाणा, शेंद्रा, रेल्वेस्टेशन, चिकलठाणा एमआयडीसीत आॅटोमोबाईल, इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिकसह विविध कंपन्यांतून वर्षभरात उत्पादनांतून सुमारे ६५ हजार कोटी रुपयांची उलाढाल होते. ट्रान्स्पोर्ट व्यावसायिकांनी विविध मागण्यांसाठी २० जुलैपासून संप पुकारला आहे. सलग सहाव्या दिवशी बुधवारी (दि.२५) मालवाहतूकदारांचा संप कायम होता. या संपाची सर्वाधिक झळ जिल्ह्यातील उद्योगांना सहन करावी लागत आहे. शहर आणि परिसरातील कंपन्यांना सहा दिवसांपासून कच्च्या मालाचा पुरवठा झालेला नाही. औद्योगिक वसाहतीत दररोज २ हजार ट्रकमधून जवळपास ३२ हजार टन कच्चामाल दाखल होत असतो. तामिळनाडू, गुजरात, चेन्नई आदी शहरांतून हा कच्चामाल शहरात दाखल होत असतो. सहा दिवसांत जवळपास १ लाख ९२ हजार टन माल दाखल झालेला नाही. त्यामुळे उत्पादनांवर परिणाम झाला आहे.
बहुतांश कंपन्यांमध्ये किमान दोन दिवसांचा कच्चामाल असतो. त्यामुळे पहिले दोन दिवस कंपन्यांवर संपाचा फारसा परिणाम जाणवला नाही. मालवाहतूकदारांचे ‘चक्का जाम’ आंदोलन लांबल्याने कंपन्यांवरील परिणामाची तीव्रता वाढली आहे. बहुतांशकंपन्यांना कच्च्या मालाच्या तुटवड्याला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे काम असून, उद्योग बंद ठेवण्याची नामुष्की कंपन्यांवर ओढावत आहे. मोठे, मध्यम आणि लघु उद्योग आणि उद्योजक आर्थिक नुकसानीला तोंड देत आहेत. कच्च्या मालाअभावी २४ तास चालणारी यंत्रे (असेंब्ली लाईन) थांबवावी लागत आहे. छोट्या-छोट्या वाहनांनी कच्चामाल मिळवून उद्योग सुरू ठेवण्याची धडपड केली जात आहे. परंतु हा प्रयत्न अपुरा पडत आहे. वाळूज येथील कंपन्यांतील उत्पादनांवर सर्वाधिक परिणाम होत आहे. संप अधिक लांबला तर उद्योगांवर मोठे आर्थिक संकट कोसळण्याची भीती व्यक्त होत आहे.
सहा दिवसांमध्ये कंपन्यांतील तयार झालेला मालही पडून आहे. त्यामुळे उत्पादनापोटी उद्योगांत येणारे कोट्यवधी रुपयेदेखील अडकू न पडले आहेत. एका उद्योगावर परिणाम झाल्याने त्यावर निगडित लघु उद्योगांची साखळी विस्कळीत झाली आहे.
१५ टक्क्यांनी उत्पादन घटले
कच्च्या मालाअभावी कंपन्यांमध्ये १५ टक्क्यांनी उत्पादनात घट झाली आहे. क च्च्या मालाअभावी उद्योगातील यंत्रे बंद पडत आहेत, अशी माहिती ‘सीएमआयए’चे अध्यक्ष राम भोगले यांनी दिली. मालवाहतूकदारांच्या संपाने सहा दिवसांमध्ये जवळपास १२५ कोटींचा भुर्दंड उद्योगांना सहन करावा लागला.
उद्योग संघटनांची शासनाकडे मागणी
मालवाहतूकदारांचा संप लांबल्याने उद्योग क्षेत्रातून चिंता व्यक्त होत आहे. संपामुळे उत्पादनांवर परिणाम होत आहे. ही बाब गांभीर्याने घेऊन तात्काळ तोडगा काढण्यात यावा, अशी मागणी शासनाकडे करण्यात आल्याचे ‘सीएमआयए’ व ‘मसिआ’ संघटनेतर्फे सांगण्यात आले.
संपाने जिल्ह्यात
इंधन विक्रीत घट
मालवाहतूकदारांच्या संपाने सहा दिवसांपासून जिल्ह्यात सुमारे ३ हजाट ट्रक बंद असल्याने डिझेलच्या मागणीत घट झाली आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेल पंपचालकांनाही आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. जिल्ह्यातील महामार्गांवर जवळपास २०० पंप आहेत. संपाने इंधन विक्रीवर परिणाम झाल्याचे औरंगाबाद पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनचे अखिल अब्बास यांनी सांगितले.