ऐतिहासिक मेहमूद व रोशन गेटच्या दुरूस्तीसाठी हवेत सव्वा कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 07:12 PM2018-06-25T19:12:51+5:302018-06-25T19:15:20+5:30
मेहमूद गेटसाठी ७५ लाख तर रोशनगेटच्या डागडुजीसाठी ६० लाख रूपयांचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले.
औरंगाबाद : जगप्रसिद्ध पाणचक्कीसमोरील ऐतिहासिक मेहमूद दरवाजातील लाकडी कवाड शुक्रवारी सकाळी निखळले. या दरवाजाच्या डागडुजीसाठी शनिवारी मनपा आयुक्तांनी बैठक घेतली. बैठकीत इन्टॅकने डागडुजीचे अंदाजपत्रकच महापालिकेला सादर केले. ७५ लाख रूपये संपूर्ण गेटच्या डागडुजीसाठी लागणार आहेत. याशिवाय सर्वाधिक वाईट अवस्था असलेल्या रोशनगेटच्या डागडुजीसाठी ६० लाख रूपयांचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले.
मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी हेरिटेज कमिटीची बैठक झाली. इतिहासतज्ज्ञ डॉ. रमजान शेख, स्नेहा बक्षी, दुलारी कुरेशी, वास्तुविशारद प्रदीप देशपांडे, महापालिकेचे उपअभियंता ए.बी. देशमुख यांची उपस्थिती होती. शहरातील प्रत्येक ऐतिहासिक स्थळाला गतवैभव कसे प्राप्त करून देता येईल, यादृष्टीने प्लॅन तयार करणे, या प्लॅननुसार प्रत्येकाचा खर्च किती याचे अंदाजपत्रक तयार करण्याची जबाबदारी इन्टॅकवर सोपविण्यात आली.
मेहमूद गेटसाठी ७५ लाख
पाणचक्कीसमोरील गेटचा काही भाग निखळल्याने शुक्रवारी सकाळी इन्टॅकच्या सदस्यांनी त्वरित पाहणी केली होती. त्यानुसार गेटचे छत कोणत्याही क्षणी कोसळू शकते. गेटच्या आजूबाजूचे प्लास्टरही जीर्ण झाले आहे. गेटवर मोठ-मोठे झाडे उगवली आहेत. डागडुजीचे संपूर्ण काम व्यवस्थित करावे लागणार आहे. वास्तुविशारद प्रदीप देशपांडे यांनी ७५ लाख रूपये खर्च येईल, असे अंदाजपत्रकच महापालिकेला बैठकीत सादर केले. सागवानमध्ये प्रवेशद्वार बसविण्यासाठी खर्च जास्त येणार आहे.
मेहमूद दरवाजावरील झाडे काढून केमिकलची फवारणी करावी लागणार आहे. दरवाजाचे आयुष्य वाढविण्यासाठी दोन्ही बाजूने रस्ता करणे आवश्यक आहे. लेबर कॉलनीतील रंगीन गेटप्रमाणे मेहमूद गेटच्या दोन्ही बाजूने सुंदर आयलॅन्ड तयार करावे लागेल, असेही देशपांडे यांनी नमूद केले. दरवाजा व पुलाचेही आयुष्य संपले असून, महापालिकेने याचेही काम सोबतच करायला हवे.
‘रोशन’साठी ६० लाखांचा खर्च
ऐतिहासिक रोशनगेटची अवस्था अत्यंत वाईट आहे. येथील विजेची डी.पी. शिफ्ट करणे, चारही बाजूने लोखंडी ग्रिल बसविणे, दर्शनी भागात आकर्षक लायटिंग, पाण्याचे कारंजे उभारण्यासाठी किमान ६० लाख रूपये खर्च येईल, असेही हेरिटेजच्या बैठकीत सांगण्यात आले.