जालन्यात पोकरा योजना पोखरून हडपले सव्वा कोटी; अधिकाऱ्यांनीच वाटली अतिरिक्त रक्कम

By बापू सोळुंके | Published: September 16, 2024 06:45 PM2024-09-16T18:45:14+5:302024-09-16T18:46:49+5:30

जालन्यातही पोकरा घोटाळा: उपविभागीय अधिकाऱ्यांकडून वसुलीचे आदेश

1.25 crore's scam in POCRA scheme at Jalana; The officers shared the extra amount | जालन्यात पोकरा योजना पोखरून हडपले सव्वा कोटी; अधिकाऱ्यांनीच वाटली अतिरिक्त रक्कम

जालन्यात पोकरा योजना पोखरून हडपले सव्वा कोटी; अधिकाऱ्यांनीच वाटली अतिरिक्त रक्कम

छत्रपती संभाजीनगर : नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना अर्थात पोकरा योजनेची अंमलबजावणी करताना छत्रपती संभाजीनगरप्रमाणे जालना जिल्ह्यातही कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. जालना येथील तीन उपविभागीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यकाळात नियम डावलून लाभार्थ्यांना अतिरिक्त रक्कम अदा केल्याचे निष्पन्न झाले आहे. अधिकाऱ्यांकडून १ कोटी २८ लाख १२ हजार रुपये वसूल करण्याचे आणि त्यांची चौकशी करण्याचे आदेश पोकराचे प्रकल्प संचालक परिमल सिंह यांनी दोन महिन्यांपूर्वी दिले.

शेतकऱ्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी त्यांना शेतीपूरक विविध योजना आणि साहित्य अनुदानावर देण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेचा टप्पा क्रमांक १ सन २०१८ ते जुलै २०२४ या कालावधीत राबविण्यात आला. राज्यातील १५ जिल्ह्यांतील निवडक तालुक्यांमध्ये या योजनेचा पहिला टप्पा राबविण्यात आला. जागतिक बँक प्रकल्पाच्या मदतीने राबविण्यात आलेल्या या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना देताना कृषी विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या मदतीने कोट्यवधी रुपयांचा अपहार केल्याच्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विविध तालुक्यांत ७२ शेतकऱ्यांनी शेडनेट न उभारताच अधिकाऱ्यांनी त्यांना लाखो रुपयांचे अनुदान अदा केले होते. एवढेच नव्हे तर मधुमक्षिकापालन योजनेत पैठण आणि कन्नड तालुक्यातील लाभार्थ्यांशी संगनमत करून लाखो रुपयांचा अपहार करण्यात आला होता. या प्रकारानंतर संबंधितांची चौकशी करण्यात आली होती. शिवाय दोन कृषी सहायकांना निलंबित करण्यात आले होते. छत्रपती संभाजीनगरनंतर आता जालना जिल्ह्यातही पोकरा योजनेत १ कोटी २८लाख १२ हजार २४१ रुपयांचा घोटाळा झाल्याचे दक्षता पथकाच्या तपासणीत आढळून आले आहे. याविषयी गोपनीय अहवाल प्राप्त होताच पोकराचे प्रकल्प संचालक परिमल सिंह यांनी कृषी आयुक्तांना पत्र पाठवून जालना जिल्ह्यातील तत्कालीन तीन उपविभागीय अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे. या अधिकाऱ्यांकडून १ कोटी २८लाख १२ हजार २४१ रुपयांची वसुली करण्याचे त्यांनी दिले.

या उपविभागीय अधिकाऱ्यांकडून वसुलीचे आदेश
तत्कालीन उपविभागीय कृषी अधिकारी शीतल चव्हाण यांच्याकडून १ कोटी २० लाख २० हजार ४१३ रुपये, रामेश्वर भुते यांच्याकडून ४ लाख २० हजार २४१ रुपये आणि व्यंकट ठक्के यांच्याकडून ३ लाख ७१ हजार ५८७ रुपये असे एकूण १ कोटी २८लाख १२ हजार २४१ रुपयांची वसुली करण्याचे निर्देश दिले आहेत.

Web Title: 1.25 crore's scam in POCRA scheme at Jalana; The officers shared the extra amount

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.