बारावीत प्रवेश घेताच केले थेट मुख्याध्यापक; परभणीतील संस्थाचालकाचा प्रताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 01:32 PM2018-08-30T13:32:01+5:302018-08-30T13:38:21+5:30
मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी बारावीत शिक्षण घेणाऱ्या नातेवाईक महिलेला थेट उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापकपदी नेमणूक दिली.
- राम शिनगारे
औरंगाबाद : परभणी जिल्ह्यातील पूर्णा येथील श्री जगदंबा विद्या प्रसारक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी बारावीत शिक्षण घेणाऱ्या नातेवाईक महिलेला थेट उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापकपदी नेमणूक दिली. ही महिला त्यावर्षी बारावीत नापास झाली. मात्र, तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांनी बी. ए. बी.पीएड. असल्याचे दाखवून मान्यता दिली. मुख्याध्यापिकेच्या पात्रतेविरोधात महाविद्यालयातील शिक्षकांनीच हिंगोली शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. त्यावरून झालेल्या चौकशीचा अहवाल औरंगाबाद शिक्षण उपसंचालकांकडे सादर झाला आहे.
या अहवालानुसार श्री जगदंबा विद्या प्रसारक मंडळ पूर्णा संस्थेचे अन्नपूर्णा देवी उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय, आरळ (ता. वसमत, जि. हिंगोली) येथे आहे. या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका रजनी नारायणराव भगत (रजनी मोहनराव मोरे) यांची १० जून १९८६ रोजी नियुक्ती झाली. तेव्हा त्या १६ वर्षांच्या होत्या. त्यावर्षी त्यांचा पूर्णा येथील रेल्वे हायर सेकंडरी स्कूलमध्ये १२ वीच्या वर्गात प्रवेश होता. मार्च १९८७ मध्ये जाहीर झालेल्या निकालात त्या नापास झाल्या. मात्र, त्यापूर्वीच त्या मुख्याध्यापक बनल्या होत्या. परभणीच्या तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांनी त्यांचा मुख्याध्यापक म्हणून १० जून १९८६ च्या नेमणुकीला ३१ मार्च १९९२ रोजी मान्यता दिली. तेव्हा त्यांची पात्रता बी.ए., बी.एड. दाखवली. त्यानुसार शिक्षणाधिकाऱ्यांनी ११ जानेवारी १९९३ रोजी भगत यांच्या मुख्याध्यापकपदाला १ मे १९८८ पासून सेवा सातत्य कायम केले होते.
मात्र, मुख्याध्यापिकेने १४ एप्रिल १९९२ रोजी शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र देऊन बी.ए., बी.एड. ऐवजी बी.ए. समकक्ष साहित्य सुधाकर ही बंबई हिंदी विद्यापीठ संस्थेची पदवी आणि डी.एड. ला समकक्ष शिवण कर्तन प्रमाणपत्र हा तीन महिन्यांचा प्रमाणपत्र कोर्स ग्राह्य धरण्याची विनंती केली. यानुसार ती प्रमाणपत्रे ग्राह्य धरून त्यांचे सेवा सातत्य १ मे १९८९ पासून मान्य करण्यात येत असल्याचे पत्र शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले. या पत्रावरील शिक्षणाधिकाऱ्यांची स्वाक्षरी बोगस असल्याचेही तक्रारकर्त्यांनी स्पष्ट केले आहे.
बंबई हिंदी विद्यापीठाच्या कागदपत्रात खाडाखोड
मुख्याध्यापकपदासाठी ग्राह्य धरलेले बंबई हिंदी विद्यापीठ संस्थेचे हिंदी भाषारत्न प्रमाणपत्र फेब्रुवारी १९८६ चे बारावी समकक्ष म्हणून दाखविले. तसेच या संस्थेचे ‘साहित्य सुधाकर’ उत्तीर्णतेचे प्रमाणपत्रही फेब्रुवारी १९८६ मधीलच आहे. हे प्रमाणपत्र पदवी समकक्ष म्हणून दाखविले. मात्र, शिक्षणाधिकाऱ्यांनी उपसंचालकांना दिलेल्या अहवालात या साहित्य सुधाकर प्रमाणपत्रात खाडाखोड करून फेब्रुवारी १९८९ असे दाखविल्याचे म्हटले आहे. मात्र, दोन्ही समकक्ष प्रमाणपत्र अवैध असल्याचे २८ फेब्रुवारी २००७ रोजी राज्य सरकारने काढलेल्या शासन निर्णयाद्वारे स्पष्ट होत आहे.
स्थापनेपूर्वीच संस्थेने दिली आॅर्डर
श्री जगदंबा विद्या प्रसारक मंडळ, पूर्णा या संस्थेची प्राथमिक नोंदणी ११ सप्टेंबर १९८६ रोजी झाली. याच संस्थेला १५ जानेवारी १९८७ रोजी कायमस्वरूपी मान्यता देण्यात आली. मात्र, मुख्याध्यापिकेला संस्थेने १० जून १९८६ रोजीच आॅर्डर दिली आहे.
कारवाई करण्यात येईल
पूर्णा संस्थेच्या मुख्याध्यापकाच्या पात्रतेविषयीचा अहवाल मिळाला आहे. यात अनेक ठिकाणी संशयास्पद कागदपत्रे असल्याचे दिसून आले आहे. संबंधितांकडून या कागदपत्रांची मूळ प्रत मागवून त्यावर पुढील कारवाई करण्यात येईल.
- वैजनाथ खांडके, शिक्षण उपसंचालक, औरंगाबाद विभाग