गोशाळेकडे सोपविल्या १३ गायी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 12:42 AM2017-11-16T00:42:22+5:302017-11-16T00:42:30+5:30
महापालिकेने पकडलेल्या मोकाट जनावरांपैकी ३७ गायींचे मालक एक महिन्यानंतरही समोर न आल्याने पहिल्या टप्प्यात १३ गायी रामेटाकळी येथील गोशाळेस पाठविण्यात आल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : महापालिकेने पकडलेल्या मोकाट जनावरांपैकी ३७ गायींचे मालक एक महिन्यानंतरही समोर न आल्याने पहिल्या टप्प्यात १३ गायी रामेटाकळी येथील गोशाळेस पाठविण्यात आल्या आहेत.
शहरातील रस्त्यावर मोकाट जनावरे फिरत असल्याने महापालिकेने या जनावरांना पकडून कोंडवाड्यात टाकले होते. मागील एक-दीड महिन्यात १७० जनावरे मनपाच्या कोंडवाडा विभागाने पकडले होते. त्यातील १२० जनावरांच्या मालकांनी मनपाशी संपर्क साधून जनावरे सोडवून घेतली. या मालकांकडून सुमारे ५० हजार रुपयांचा दंड वसूल केल्याची माहिती कोंडावाडा विभाग प्रमुख विनय ठाकूर यांनी दिली. दरम्यान, ३७ जनावरांच्या मालकांनी एक महिन्यानंतरही मनपाच्या कोंडवाडा विभागाशी संपर्क साधला नसल्याने मनपाच्या सर्वसाधारण सभेत घेतलेल्या ठरावानुसार ही जनावरे गोशाळेस देण्याचा निर्णय घेण्यात आला. या अंतर्गत ३७ गायी गोशाळेला दिल्या जाणार असून, बुधवारी पहिल्या टप्प्यात १३ गायी रामेटाकळी येथे गोशाळेला पाठविण्यात आल्या. उर्वरित जनावरे येत्या दोन दिवसांत पाठविली जाणार असल्याची माहिती मनपा सूत्रांनी दिली.