फुलंब्री शहरात बसणार १३ हायमास्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:04 AM2021-06-05T04:04:26+5:302021-06-05T04:04:26+5:30
फुलंब्री : नगर पंचायतीच्या वतीने संपूर्ण शहराला प्रकाशमय करण्याचे काम सुरू झाले आहे. यासाठी विविध योजनांतून पावने दोन कोटी ...
फुलंब्री : नगर पंचायतीच्या वतीने संपूर्ण शहराला प्रकाशमय करण्याचे काम सुरू झाले आहे. यासाठी विविध योजनांतून पावने दोन कोटी रुपयांचा निधी प्राप्त झालेला आहे. या कामात आणखी भर टाकत शहरातील विविध चौकांमध्ये १३ हायमास्ट बसविले जाणार आहेत. शहर विकासाच्या दृष्टीने हे चांगले पाऊल असल्याचे बोलले जात आहे.
राज्य सरकारचा नगर विकास विभाग व केंद्र सरकारच्या शहरी विकास योजनेअंतर्गत विविध विकासकामे राबविली जातात. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी सुधार योजनेमधून मिळालेल्या अनुदानातून हायमास्ट पथदिवे तसेच महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजने अंतर्गत शहरातील जास्त वर्दळ असलेल्या चौकात तसेच हमरस्ता असलेल्या ठिकाणी हायमास्ट बसविण्यात येत आहेत. केंद्र सरकारच्या शहरी विकास योजनेतून विद्युत खांबांबर एलईडी बसविले जात आहेत.
--
महत्त्वाच्या मार्गावर हायमास्ट
फुलंब्री नगर पंचायतीकडून हायमास्ट दिवे हे दलित वस्ती, जमाल शहा बाबा दर्गा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, समाज मंदिर, मारोती गणपती मंदिर, तहसील कार्यालय, न्हावी समाज मंदिर, काथार गल्ली, साई पार्क, गिरिजा नगर, सारा कॉलनी, संत सावता मंदिर, फतेह मैदान, जामा मशीद अशा महत्त्वाच्या ठिकाणी बसविले जाणार आहेत. नगर पंचायतीकडून यापूर्वी लावण्यात आलेल्या पथदिव्यांसाठी एक कोटी ८२ लाखांचा खर्च केला गेला. आता आणखी ७० लाखांचा निधी मिळालेला आहे, अशी माहिती नगराध्यक्ष सुहास शिरसाठ यांनी दिली.