१३ पुरवठादारांनी रोखला ‘सर्वोपचार’चा औषधपुरवठा
By Admin | Published: January 31, 2017 12:11 AM2017-01-31T00:11:08+5:302017-01-31T00:12:46+5:30
लातूर सर्वसामान्य रुग्णांना आरोग्य सुविधा पुरविणारे शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात सध्या औषधांअभावी संकटात सापडले आहे़
हरी मोकाशे लातूर
सर्वसामान्य रुग्णांना आरोग्य सुविधा पुरविणारे शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात सध्या औषधांअभावी संकटात सापडले आहे़ दीड महिन्यापूर्वी औषधी पुरवठ्याचा प्रस्ताव पाठवूनही औषध कंपन्या, कंत्राटदारांकडून पुरवठा करण्यात आला नाही़ जवळपास चार कोटींच्या थकबाकीमुळे हा पुरवठा रोखण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले़
शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात दर्जेदार सुविधा मिळत असल्याने जिल्ह्याबरोबरच परजिल्ह्यातील तसेच सीमावर्ती भागातील रुग्ण येतात़ त्यामुळे दररोज १३०० पेक्षा जास्त रुग्णांची तपासणी व उपचारासाठी नोंदणी असते़ सर्वोपचार रुग्णालयास वर्षाकाठी साडेपाच कोटी रुपयांपेक्षा जास्त औषधी लागतात़ या औषधी शासनाच्या दर करारानुसार औषधी कंपन्या तसेच कंत्राटदारांकडून खरेदी केल्या जातात़ दर तीन महिन्यांस सर्वोपचारमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यात उपलब्ध औषधींचा आढावा घेतला जातो़ गत डिसेंबरमध्ये हा आढावा घेण्यात येऊन जंतूनाशक, आयव्ही फ्ल्यूज, मेंदूविकार यासह शस्त्रक्रिया विभागातील औषधी आणि साहित्यांचा प्रस्ताव १३ कंत्राटदारांकडे पाठविण्यात आला़ ही औषधी व साहित्याचा डिसेंबरच्या अखेरीसपर्यंत पुरवठा होणे अपेक्षित होते़ परंतु, जानेवारी संपत आला तरी अद्यापही हा पुरवठा झाला नाही़ ही औषधी जवळपास ५५ ते ६० लाख रुपयांची असल्याचे सूत्रांनी सांगितले़
सर्वोपचारला जवळपास दीडशे कंपन्या आणि कंत्राटदारांकडून औषध पुरवठा होतो. या पुरवठाधारकांचे सन २००५ पासून बिले थकीत आहेत़ त्यात औषध पुरवठा करणाऱ्या २० कंपन्या, कंत्राटदारांचे २२९ बिले थकीत असून त्याची १ कोटी १ लाख ६७ हजार ७४४ रुपये, तसेच याच कंपन्यांची दोन कोटींची १९७ बिले थकली आहेत़ सर्जिकल साहित्य पुरवठा करणाऱ्या २८ कंपन्यांची १ कोटी ९९ लाखांची ३१० बिले थकीत राहिली आहेत़