पोहण्यासाठी गेलेल्या तेरावर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:02 AM2021-07-02T04:02:56+5:302021-07-02T04:02:56+5:30
दूधड : मित्रासोबत पोहण्यासाठी डोंगरपायथ्याशी असलेल्या पाझर तलावात गेलेल्या सहा मुलांपैकी एका मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही ...
दूधड : मित्रासोबत पोहण्यासाठी डोंगरपायथ्याशी असलेल्या पाझर तलावात गेलेल्या सहा मुलांपैकी एका मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास औरंगाबाद तालुक्यातील दूधड शिवारात घडली. साई कैलास भिसे (रा. भांबर्डा) असे मृत मुलाचे नाव आहे.
या घटनेची सविस्तर माहिती अशी की, बुधवारी दुपारी पावणेचार वाजेच्या दरम्यान साई भिसे व त्याच्या मित्रांचा दूधड येथील लहुकी नदीवरील सिमेंट बंधाऱ्यात पोहायला जाण्याचा प्लॅन होता. मात्र तेथे ज्येष्ठ व्यक्ती आपल्याला पोहू देणार नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी दूधड शिवारातील डोंगरपायथ्याशी असलेल्या पाझर तलावाकडे आपला मोर्चा वळविला. साईच्या सर्व मित्रांनी पाण्यात उडी मारली. साईला मात्र पाेहता येत नव्हते. पोहणे शिकण्याच्या उद्देशाने त्यानेही पाण्यात उडी मारली. मात्र त्याला खोलीचा अंदाज न आल्याने तो पाण्याबाहेर आलाच नाही. साई बुडाल्याचे लक्षात आल्यानंतर मित्रांनी त्याला शोधण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र, तो सापडत नसल्याने मुलांनी आरडाओरड केली. यानंतर शेजारच्या शेतातील शेतकरी घटनास्थळी धावले. गावातील ग्रामस्थांनाही या घटनेची माहिती कळविण्यात आली. यानंतर काहीजणांनी तलावात उडी मारून साईला पाण्याबाहेर काढून करमाड येथील रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.
चौकट
भिसे कुटुंबावर शोककळा
कैलास भिसे यांना दोन मुले व दोन मुली आहेत. त्यापैकी साईचा बुडून मृत्यू झाल्याने मोलमजुरी तसेच ज्योतिषाचा व्यवसाय करून जगणाऱ्या या गरीब कुटुंबावर आघात झाला आहे. बुधवारी रात्री साईवर भांबर्डा येथे शोकाकूल वातावरणात अंत्यविधी करण्यात आला.
फोटो :
010721\01_2_abd_54_01072021_1.jpg
साई कैलास भिसे