सिद्धार्थ उद्यानातील १३ वर्षांच्या आजारी ‘नाझिया’चा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 05:03 PM2019-09-14T17:03:08+5:302019-09-14T17:10:44+5:30
सहा दिवसांपासून आजारी
औरंगाबाद : सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणिसंग्रहालयातील मादी बिबट्या (नाझिया) हिचा काल रात्री ८.३० वाजता मृत्यू झाला. १३ वर्षांची नाझिया मागील सहा दिवसांपासून अंथरुणाला खिळली होती. उपचारालाही अजिबात प्रतिसाद देत नव्हती. आज दुपारी प्राणिसंग्रहालयातच तिच्यावर वन विभागाच्या नियमावलीनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले.
प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. बी. एस. नाईकवाडे मागील काही महिन्यांपासून निलंबित होते. ते पुन्हा रुजू होताच प्राण्यांचे मृत्यू सत्र सुरू झाले. रेणू या वाघिणीची पिल्ले सतत मरण पावत असल्याने डॉ. नाईकवाडे यांना निलंबित करण्यात आले होते. अलीकडेच पुन्हा त्यांना निलंबित केले होते. डॉ. निपुण विनायक यांनी नाईकवाडे यांना रुजू करून घेतले. बिबट्या मादी नाझिया अवघ्या ३ वर्षांची असताना तिला संजय गांधी नॅशनल पार्क, बोरीवली येथून आणण्यात आले होते. मागील १० वर्षांपासून नाझिया आनंदाने सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणी संग्रहालयात राहत होती. मागील सहा दिवसांपासून ती अंथरुणाला खिळली होती. डॉ. नीती सिंग तिच्यावर उपचार करीत होते. तिच्या रक्त, विष्ठेचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते.
या अहवालावरून औषधोपचार सुरू होते. औषधोपचाराला नाझिया अजिबात प्रतिसाद देत नव्हती. गुरुवारी रात्री ८.३० वाजता तिने अखेरचा श्वास घेतला. सकाळी महापौर नंदकुमार घोडेले यांनी पाहणी केली. त्यानंतर १०.३० वाजता खडकेश्वर पशुसंवर्धन कार्यालयातील सहायक आयुक्त डॉ. वल्लभ जोशी, डॉ. अश्विनी यांनी तिचे शवविच्छेदन केले. तिचा व्हिसेरा पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आला. वन परिक्षेत्र अधिकारी एस.बी. तांबे यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला. वन विभागाच्या नियमानुसार नाझियावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
१८ ते २० वर्षे वयोमर्यादा
पिवळे वाघ, बिबट्या साधारणपणे १८ ते २० वर्षे सहजपणे जगतात, अशी माहितीही सूत्रांनी दिली. नाझिया अवघ्या १३ वर्षांची असताना ती मरण पावल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. बिबट्यांची संख्या वाढू नये म्हणून मागील काही वर्षांपासून तिला एकटीच ठेवण्यात आले होते.