तुळजाभवानी मंदिरासाठी १३२८ कोटींचा निधी, मराठवाडा तिर्थक्षेत्र विकासाचं मोठं पॅकेज
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2023 05:15 PM2023-09-16T17:15:28+5:302023-09-16T17:17:31+5:30
मराठवाड्यातील ३५ सिंचन प्रकल्पांना सुधारित मान्यता देण्यात आली.
छ. संभाजीनगर - मराठवाड्यातील विकासासाठी मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. मराठवाड्याला जलसिंचन व्यतिरिक्त इतरही विकास प्रकल्पांची घोषणा केली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यामध्ये, तिर्थक्षेत्र विकासासाठीही कोट्यवधींचा निधी राज्य सरकारने देऊ केला आहे. त्यामध्ये, महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानी मंदिराच्या विकासासाठी तब्बल १३२८ कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर करण्यात आला आहे.
मराठवाड्यातील ३५ सिंचन प्रकल्पांना सुधारित मान्यता देण्यात आली. यामुळे ८ लाख हेक्टर जमिन ओलिताखाली येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यासाठी १४ हजार कोटी रुपये खर्च करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. तसेच विविध प्रकल्पांसाठी ४५ हजार कोटी रुपयांच्या विकास कामांचा निर्णय घेण्यात आला आहे. एकूण ५९ हजार कोटीं रुपयांचा निधी मराठावाड्याच्या विकासासाठी देण्यात आलाय. त्यामध्ये, शेतकरी हाच केंद्रबिंदू आहे. यासह धार्मिक पर्यंटनासाठी तिर्थक्षेत्र विकास निधीअंतर्गत प्रसिद्ध मंदिरांचा विकास करण्यात येत आहे.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्यानुसार, धाराशिव जिल्ह्यातील तुळजाभवानी मातेच्या मंदिरासाठी तब्बल १३२८ कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर करण्यात आला आहे. त्यासह, घृष्णेश्वर मंदिरासाठी १५६ कोटी, औंढा-नागनाथ मंदिरासाठी ६० कोटी, उदगीर येथील बाबांच्या समाधीस्थळासाठी १ कोटी, परळी तिर्थक्षेत्र २४० कोटी, महादेव मंदिर विकाससाठी १४५ कोटी, मानव विकास कार्यक्रम असे अनेक तिर्थक्षेत्र विकासासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे, पर्यटन आणि धार्मिक स्थळांचाही विकास होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.