मराठवाड्यात पहिल्या दिवशीच १३.३२ लाख वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 05:26 PM2018-07-02T17:26:04+5:302018-07-02T17:27:29+5:30
यंदा सरकारने राज्यात १३ कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. मोहिमेच्या पहिल्याच दिवशी रविवारी (दि.१) मराठवाड्यात १३.३२ लाख रोपटे लावण्यात आल्याची आॅनलाईन माहिती वनविभागाकडे आल्याने उत्साह वाढला आहे.
- साहेबराव हिवराळे
औरंगाबाद : यंदा सरकारने राज्यात १३ कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. मोहिमेच्या पहिल्याच दिवशी रविवारी (दि.१) मराठवाड्यात १३.३२ लाख रोपटे लावण्यात आल्याची आॅनलाईन माहिती वनविभागाकडे आल्याने उत्साह वाढला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वृक्षलागवडीसाठी केलेल्या घोषणेला मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांतून भरभरून प्रतिसाद मिळाला. मे आणि जून महिन्यात वनविभाग तसेच सामाजिक वनीकरण विभागाने बैठका घेऊन वृक्षलागवडीसाठी जनजागृती केली. यंदा कृषी विभागामार्फत घेतलेल्या फळबागांचा देखील वृक्षलागवडीत समावेश केला जाणार आहे. बांबू शेतीचाही समावेश झालेला आहे.
पर्यावरणातील समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने या मोहिमेत सहभाग घेतलाच पाहिजे. ज्याप्रमाणे कुटुंबाचे संरक्षण केले जाते, त्याचप्रमाणे वृक्षारोपण केल्यानंतर त्या रोपट्याला जपावे, त्याचे संगोपण करण्याची जबाबदारीदेखील देण्यात आलेली आहे. शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालये, स्वयंसेवी संस्थादेखील या उपक्रमात सरसावल्या आहेत.
या मोहिमेत मराठवाड्यास २.९२ कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले असून ते १५ दिवसांत साध्य करावयाचे आहे, असे वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक पी. के. महाजन, उपवनसंरक्षक वडसकर यांनी सांगितले. सामाजिक वनीकरणचे नितीन गुदगे म्हणाले की, शाळा व सामजिक संस्थांचा या उपक्रमात मोठा सहभाग राहणार आहे.
मराठवाड्यासाठी दिलेले उद्दिष्ठपूर्तीसाठी यावर्षी गृहनिर्माण सोसायट्या, रेशन दुकानदारासह सर्व स्वयंसेवी संस्थांचा सहभाग घेतला आहे. हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीदिनी मराठवाड्यातील विविध जिल्हा व तालुकास्तरावर वृक्षारोपणाचे कार्यक्रम घेण्यात आले. औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री परिसरात विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले.
‘सीड बॉल’चे लक्ष्य नदीकाठ व डोंगर
औरंगाबाद येथील साकला नर्सरीतर्फे १ ते १० जुलैपर्यंत ५० हजार सीड बॉल तयार करण्यात येतील. स्थानिक संस्थादेखील सीड बॉल बनविण्याचा उपक्रम राबवित आहेत. १ जुलै रोजी सीड बॉल बनविण्याच्या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनीही सहभाग नोंदविला होता. हे सीड बॉल नदीकाठी तसेच डोंगर आणि मोकळ्या जागेवर टाकले जाणार आहेत.
मराठवाड्यातील आकडेवारी :
औरंगाबाद - ९० हजार ८१०
जालना - ५२ हजार ८३८
बीड -२ लाख ६६ हजार ७६५
हिंगोली -१ लाख २४ हजार ८७२
नांदेड -६७ हजार ४५८
उस्मानाबाद- २ लाख ७४ हजार ८८७
लातूर - ३ लाख ३८ हजार ७
परभणी - १ लाख १७ हजार ६१
असा एकूण १३ लाख ३२ हजार ६९८ वृक्षांची लागवड झाल्याची आॅनलाईन आकडेवारी वनविभागाकडे आली आहे.