साडेतीन तासांत १३४२ महिलांनी बनविले ७२,७४४ लाडू; आषाढी एकादशीला पंढरपुरात वाटणार
By प्रशांत तेलवाडकर | Published: June 26, 2023 08:22 PM2023-06-26T20:22:00+5:302023-06-26T20:22:59+5:30
‘माझा एक तरी लाडू माझ्या पांडुरंगाला’ या उपक्रमाचे यंदाचे १६ वे वर्ष.
छत्रपती संभाजीनगर : गायिका सरला शिंदे या विठ्ठलाचे गाणे गात होत्या आणि त्या तालावर महिला शेंगदाणा-गुळाचा लाडू तयार करीत होत्या. काही महिला टाळ वाजवत नृत्य करीत सर्वांचा उत्साह वाढवीत होत्या... तर विठ्ठल-रुख्मिणीची वेशभूषा केलेली मुले टोपलीत तयार लाडू घेऊन दुसऱ्या खोलीत ठेवत होते... आपण बनविलेला लाडू पंढरपुरात विठोबासमोर नैवेद्य दाखविण्यात येणार व नंतर वारकरी तो लाडू प्रसाद म्हणून खाणार, या कल्पनेनेच महिला धन्य होत्या. रविवारी १३४२ महिलांनी साडेतीन तासांत ७२,७४४ लाडू तयार करून आपला मागील वर्षीचा विक्रम मोडला.
‘माझा एक तरी लाडू माझ्या पांडुरंगाला’ या उपक्रमाचे यंदाचे १६ वे वर्ष. सिंधी कॉलनीतील बालाजी मंगल कार्यालयात महिला भाविकांची गर्दी जमली होती. नियोजनानुसार सकाळी ११ वाजता लाडू बांधण्यास सुरुवात होणार होती, पण महिलांची वाढती गर्दी लक्षात घेऊन अर्धा तास आधीच म्हणजे १०:३० वाजता लाडू बांधण्यास सुरुवात झाली. गटागटाने गोल रिंगण करून महिला बसल्या होत्या व शेंगदाण्याचे कूट व गूळ घेऊन लाडू बांधत होत्या.
एक तास झाल्यावर त्या महिला उठत होत्या व दुसऱ्या महिलांना जागा करून देत होत्या. दुपारी २ वाजेपर्यंत शेंगदाणा व लाडूचा कूट संपला व लाडू बनविणे थांबले. साडेतीन तासांत ७२७४४ लाडू तयार झाले होते. यशस्वितेसाठी मनोज सुर्वे, लक्ष्मीकांत सुर्वे, विलास गायकवाड, उमाकांत वैद्य, अर्जुन पवार, भैरव कुलकर्णी, भीमराव कुलकर्णी, जगन्नाथ गीते आदी भाविकांनी सहकार्य केले.
पुढील वर्षी १ लाख
यंदा ७० हजार लाडूंचा संकल्प होता. प्रत्यक्षात ७२,७४४ लाडू तयार झाले. पुढील वर्षी १ लाखाचा संकल्प आहे.
- कुश सर्वे,आयोजक
खास पुण्याहून आले
‘माझा एक तरी लाडू माझ्या पांडुरंगाला’ या उपक्रमात मी पाच वर्षांपासून खास पुण्याहून येत आहे.
- मयुरी राठोड, भाविक
परमानंद मिळतो
आपण बनविलेला लाडू पंढरपुरात विठ्ठलासमोर नैवेद्य दाखविला जातो व नंतर वारकरी त्याचा आस्वाद घेतात, ही कल्पनाच परमानंद देऊन जाते.
- ज्योती नंदावने, भाविक
वारकऱ्यांची अशी सेवा
पंढरपूरला जाता आले नाही. मात्र, येथेच शेंगदाणा व गुळाचे लाडू बनविले व ते आषाढीला वारकऱ्यांना देण्यात येणार आहेत. आपलाही खारीचा वाट हाच आनंद.
- प्रतीक्षा पवार,भाविक