रागाच्या भरात घर सोडलेली १४ बालके पालकांच्या स्वाधीन; रेल्वे पोलिसांची विधायक कामगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 07:47 PM2018-09-18T19:47:29+5:302018-09-18T19:48:18+5:30
रागाच्या भरात घरातून निघून गेलेल्या १४ बालकांना औरंगाबाद रेल्वे पोलिसांनी पालकांच्या स्वाधीन केले
औरंगाबाद : हट्ट न पुरविल्याने वा इतर किरकोळ कारणांवरून रागाच्या भरात घरातून निघून गेलेल्या १४ बालकांना औरंगाबाद रेल्वे पोलिसांनी पालकांच्या स्वाधीन केल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.
अभ्यासाचा कंटाळा, टीव्ही पाहू न देणे, एखादी इच्छा पूर्ण न होणे वा आई-बाबा रागावले तर लहान मुले याचा राग धरून घरातून निघून जात असल्याचे अनेक घटनांवरून दिसून आले आहे. मुंबई वा उपनगरांमध्ये अशी अनेक उदाहरणे गत काही वर्षांत आढळून आलेली आहेत. मात्र, पोलिसांची सतर्कता व सजगतेमुळे ही बालके त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आली आहेत. पोलिसांच्या या कार्यामुळे या मुलांचे भवितव्य धोक्यात जाण्यापासून वाचले आहे.
औरंगाबाद रेल्वे स्थानकावर जानेवारी ते ३१ आॅगस्ट २०१८ या काळात तब्बल १४ बालके संशयास्पद स्थितीत रेल्वे पोलिसांना आढळून आली. त्यांची सखोल चौकशी केल्यानंतर पालकांना बोलावून घेत दोघांचे समुपदेशन करण्यात आले. त्यानंतर ही बालके पालकांच्या स्वाधीन करण्यात आली आहे.
औरंगाबाद शहरातील एका खाजगी वसतिगृहात राहणारा व इयत्ता पाचवी शिकणारा सुरेश (नाव बदलले आहे) हा वसतिगृहातील लोक त्रास देतात म्हणून तेथून पळून आला होता. सुरेश मूळचा परतूर तालुक्यातील डोल्हारा येथील रहिवासी असून, शेतकरी असलेल्या त्याच्या पालकांनी केवळ शिक्षणासाठी त्याला औरंगाबाद शहरात ठेवले आहे. रेल्वे पोलिसांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर या मुलाची चौकशी केली. त्यानंतर एनजीओला फोन करून याची माहिती दिली. वसतिगृह चालकाला याची कल्पनाही नव्हती. रेल्वे पोलिसांनी सुरेशचे पालक, वसतिगृहचालक आणि एनजीओला बोलावले.
सर्वांचे समुपदेशन केल्यानंतर सुरेशची पुन्हा वसतिगृहात रवानगी करण्यात आली. ही बाब रेल्वे पोलिसांच्या निदर्शनास आली नसती, तर या मुलाचे काय भवितव्य असते, याचा विचारच केलेला बरा. औरंगाबाद रेल्वे पोलिसांनी आठ महिन्यांत अशी १४ बालके शोधली. त्यांना सुखरूपपणे त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले. ही कार्यवाही एएसआय दिलीप कांबळे, एसआयपीएफ एम.जी. कसबे, डी.आर. नरवडे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी पूर्ण केली.
चाईल्ड हेल्पलाईनचा आधार
१०९८ या क्रमांकावरील चाईल्ड हेल्पलाईनच्या मुलांसह पालकांचे समुपदेशन करण्यासाठी आधार घेतला जातो. देशभरात विविध स्वयंसेवी संस्था या माध्यमातून कार्यरत असून, हेल्पलाईनद्वारे समुपदेशन प्रक्रियेत सहभागी होतात. या हेल्पलाईनमुळे अनेक बालके सुखरूपपणे त्यांच्या घरी पोहोचविण्यात आल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले.
स्थानकासह परिसरात कुठलीही संशयास्पद व्यक्ती आढळून आली, तर त्याची चौकशी केली जाते. गत आठ महिन्यांत १४ बालके स्थानकावर आढळून आली. त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.
- अरविंदकुमार शर्मा, निरीक्षक, रेल्वे पोलीस दल, औरंगाबाद