जिल्ह्यात १४ लाख मोबाईलधारक
By Admin | Published: October 28, 2015 11:50 PM2015-10-28T23:50:12+5:302015-10-29T00:21:57+5:30
राजकुमार जोंधळे , लातूर जिल्ह्यातील २५ लाख लोकसंख्येपैकी २४ लाख लोकांच्या हाती मोबाईल असल्याचे ‘लोकमत’च्या सर्व्हेक्षणात पुढे आले आहे.
राजकुमार जोंधळे , लातूर
जिल्ह्यातील २५ लाख लोकसंख्येपैकी २४ लाख लोकांच्या हाती मोबाईल असल्याचे ‘लोकमत’च्या सर्व्हेक्षणात पुढे आले आहे. विविध खाजगी कंपन्यांचे मोबाईल ग्राहक हे १२ लाख ७७ हजारांवर आहेत. तर सर्वात कमी भारत दूरसंचार निगमला ग्राहकांनी पसंती दिली आहे. मोबाईल स्पर्धेत बीएसएनएल मागे पडल्याचे दिसून येते. बीएसएनएलच्या सेवेला १ लाख २३ हजार लोकांनी पसंती दिली आहे.
विशेष म्हणजे यात १९ हजार ५९६ लँडलाईन फोन वापरणाऱ्यांची संख्या आहे. अलिकडे प्रत्येकांच्या हाती मोबाईल आल्यामुळे लँडलाईन कालबाह्य होणार का? अशी भीती वाटत होती. मात्र अलिकडे हा आकडा वाढू लागला आहे. आजही लँडलाईन वापरणे म्हणजे प्रतिष्ठेचे लक्षण असल्याचे मानले जाते. आपल्या व्हीजेटिंग कार्डवर मोबाईल क्रमांकाबरोबर लँडलाईनचा क्रमांक असणे हे प्रतिष्ठेचे समजले जाते. गेल्या दहा वर्षापूर्वी हाच आकडा ८० हजारांच्या घरात होता. आता ७५ टक्के ग्राहकांची संख्या कमी झाली आहे. बीएसएनएलने अलिकडे नव्या-नव्या योजना सुरु केल्या आहेत. मोबाईलच्या बाजारात खाजगी कंपन्यांची आर्थिक उलाढाल ही महिन्याकाठी जिल्हाभरात शेकडो कोटींच्या घरात आहे. खाजगी कंपन्यांची सेवा सुरु आहे. प्रत्येकांत मोठी स्पर्धा आहे. या स्पर्धेत बीएसएनएलची मात्र सरकारी स्पर्धा आहे. या खाजगी कंपन्यांच्या मानाने बीएसएनएलकडे एवढी अत्याधुनिक यंत्रणा नाही. आहे त्या यंत्रणेवर बीएसएनएल आपला गाडा हाकत आहे. रोज नव्या-नव्या योजनांचा धमका सुरु करुन ग्राहकांच्या खिशातून कसा पैसा काढता येईल, यासाठी खाजगी कंपन्या विचार करतात.
सध्याला खाजगी कंपन्यांत मोठी स्पर्धा आहे. प्रत्येकजण आपल्याच कंपनीकडून ग्राहकांचे हित साधले जाते, असा दावा करतो. ग्राहकांना विविध आॅफर देवून, आकर्षित केले जाते. या आकर्षणापोटी मोबाईल ग्राहक महिनाकाठी किमान सातशे ते हजार रुपये आलेल्या मोबाईल बिलावर खर्च करतो.