सेकंडहँड गाडीसाठी आधी १४ लाख दिले; उरलेली रक्कम नेली, पण गाडीसह मालक फरार
By सुमित डोळे | Published: January 11, 2024 11:54 AM2024-01-11T11:54:40+5:302024-01-11T11:55:26+5:30
उरलेली ३ लाखांची रक्कम नेली असता गाडी मालकाचे घर बंद, फोन बंद
छत्रपती संभाजीनगर : व्यवसायातून ओळख झालेल्या कुशल ट्रेडिंग कंपनीचा मालक संतोष श्यामल दास याने त्याची गाडी विकण्याच्या बहाण्याने दुसऱ्या व्यावसायिकाला १३ लाख ८५ हजारांना फसवले. याप्रकरणी त्याच्यावर एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला.
सुनील ढोले (रा. शेंद्रा) यांचा इलेक्ट्रिक साहित्याचा व्यवसाय आहे. त्यातून त्यांची दाससोबत ओळख होती. मे, २०२३ मध्ये दासने २८ लाखांमध्ये एम. जी. हेक्टर चारचाकी विकत घेतली. १ डिसेंबर रोजी दासने सुनील यांना भोपाळला स्थायिक होत असल्याचे सांगितले. त्याआधी त्याने वाहन विकण्याची इच्छा व्यक्त केली. नेहमीचे संबंध असल्याने सुनील यांनी त्यासाठी तयारी दाखवली. १७ लाख रुपयांमध्ये सौदा ठरला. सुनील यांनी कर्ज काढून दासला १३.८५ लाख रुपये दिले.
घर बंद, सामान विकून पैसे भर
३ जानेवारी रोजी सुनील यांनी त्याला रक्कम दिल्यानंतर वाहनाचा ताबा मागितला. मात्र, दासने उरलेले पैसे दिल्यानंतरच ताबा देईल, असे सांगितले. ४ जानेवारी रोजी सुनील उरलेले पैसे घेऊन त्याच्या घरी गेले असता घर बंद दिसले. दुकानदेखील बंद होते. दासचे मोबाइल बंद होते. ५ जानेवारी रोजी व्हॉट्सॲप मेसेजवर दास ने तू माझ्या घरातील सामान विकून हप्ते भर, पण मला कॉल करू नको, असे सांगत संपर्क बंद केला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर सुनील यांनी पोलिसांकडे धाव घेतली.