एटीएममधून निघाल्या १४ हजारांच्या फाटक्या नोटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2018 10:32 PM2018-12-03T22:32:10+5:302018-12-03T22:33:06+5:30
एटीएममधून काढलेल्या २० हजार रुपयांपैकी १४ हजार रुपयांच्या फाटक्या (दोन हजारांच्या सात नोटा) नोटा ग्राहकाच्या हातात पडल्या. हा प्रकार सोमवारी सायंकाळी साडेचार वाजता शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय परिसरातील भारतीय स्टेट बँकेच्या एटीएमवर घडला.
औरंगाबाद : एटीएममधून काढलेल्या २० हजार रुपयांपैकी १४ हजार रुपयांच्या फाटक्या (दोन हजारांच्या सात नोटा) नोटा ग्राहकाच्या हातात पडल्या. हा प्रकार सोमवारी सायंकाळी साडेचार वाजता शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय परिसरातील भारतीय स्टेट बँकेच्याएटीएमवर घडला.
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात जयंत चवरे हे लघुलेखक आहेत. त्यांनी सोमवारी (दि.३) महाविद्यालय परिसरातील एसबीआयच्या एटीएममधून २० हजार रुपये काढले. त्यांना दोन हजाराच्या दहा नोटा प्राप्त झाल्या. या नोटांपैकी १४ हजार रुपये मूल्याच्या सात नोटा फाटक्या निघाल्या. एटीएममधून फाटक्या नोटा मिळण्याचा त्यांचा हा दुसरा अनुभव होता. यातील काही नोटांवर निळ्या शाईच्या पेनने लिहिलेले होते, तर काही नोटा ठिकठिकाणी फाटलेल्या असल्याने सेलो टेप लावून चिकटविण्यात आल्या होत्या. सहा महिन्यांपूर्वी त्यांना एटीएममधून दोन हजाराची एक फाटकी नोट प्राप्त झाली होती. त्यावेळी बँकेने त्यांना ती फाटकी नोट चलनाद्वारे खात्यात जमा करण्याचे सांगितले होते. याविषयी चवरे म्हणाले की, मला पैशांची आवश्यकता असल्याने एटीएममधून २० हजार रुपये काढले. यातील सात नोटा खराब असल्याने मला त्या नोटांचा वापर करता आला नाही.