तब्बल १४ वर्षांनी झाली निर्दोष मुक्तता
By Admin | Published: May 20, 2014 01:24 AM2014-05-20T01:24:19+5:302014-05-20T01:33:23+5:30
गंगापूर : शासकीय कामात अडथळा आणल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झालेल्या १३ जणांची तब्बल १४ वर्षांनंतर निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
गंगापूर : शासकीय कामात अडथळा आणल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झालेल्या १३ जणांची तब्बल १४ वर्षांनंतर निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. गंगापूर तहसील कार्यालयात २००० साली उसाच्या पंचनाम्यावरून शेतकरी व तत्कालीन तहसीलदार यांच्यात झालेल्या शाब्दिक चकमकीवरून १३ जणांविरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. यावेळी उपस्थित अप्पासाहेब माने, लक्ष्मण सांगळे, बबनराव जगताप, रमेश पाखरे यांनी व अन्य शेतकर्यांनी तहसीलारांना याबाबत जाब विचारला असता तहसीलदारांनी कथितरीत्या उद्धटपणाची वागणूक दिली. यावरून काही वेळ या ठिकाणी तणावाचे वातावरण होते. शेतकर्यांची संख्या वाढत गेली. प्रकरण आपल्यावर शेकणार, या भीतीपोटी तहसीलदारांनी १३ जणांविरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याच्या आरोपाखाली गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. गंगापूर न्यायालयात सन २००० पासून आतापर्यंत खटला सुरू होता. १४ वर्षे या न्यायालयाने या प्रकरणाशी संबंधितांची चौकशी करून साक्षीदार तपासल्यानंतर १२ लोकांना न्यायाधीश अ.उ. बहीर यांनी निर्दोष मुक्त केले. दरम्यानच्या काळात १३ लोकांपैकी एकाचे निधन झालेले होते. आरोपीच्या वतीने अॅड. दत्तात्रय पानकडे, अॅड. एकनाथ पानकडे यांनी काम पाहिले. (वार्ताहर) उसाच्या नुकसानभरपाईचे प्रकरण त्या वर्षी गाळपाअभावी शेकडो एकरातील ऊस उभा होता. या उसाचे पंचनामे करून शेतकर्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकर्यांची होती. याबाबत शासनानेदेखील उसाचे पंचनामे करून शेतकर्यांना नुकसानभरपाई देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार शासन आदेशावरून संबंधित शेतकर्यांचे पंचनामे होऊन नुकसानभरपाईची रक्कमही तहसील कार्यालयात आलेली होती. ती रक्कम तहसीलच्या सुट्यांच्या अगोदर देण्यात यावी, या मागणीसाठी शेतकरी संतप्त झाले होते.