विद्यार्थिनीशी लैंगिक चाळे करणाऱ्या शिक्षकाला १४ वर्षे सश्रम कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 07:19 PM2019-04-11T19:19:53+5:302019-04-11T19:21:08+5:30
विशेष म्हणजे खटल्याच्या सुनावणीदरम्यान पीडित मुलगी, तिची आई व मुलीच्या ३ मैत्रिणी, असे ५ साक्षीदार फितूर झाले
औरंगाबाद : भर वर्गात अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत लैंगिक चाळे करणारा शिक्षक सोहेल अब्दुल रऊफ पठाण (२७, रा. कटकटगेट, औरंगाबाद) याला बुधवारी (दि.१०) विशेष न्यायाधीश ए. एस. खडसे यांनी १४ वर्षे सश्रम कारावास आणि साडेपाच हजार रुपये दंड ठोठावला.
विशेष म्हणजे खटल्याच्या सुनावणीदरम्यान पीडित मुलगी, तिची आई व मुलीच्या ३ मैत्रिणी, असे ५ साक्षीदार फितूर झाले असतानाही न्यायालयाने सबळ पुराव्याआधारे ‘पोस्को’ कायद्यान्वये ही शिक्षा ठोठावली आहे.
यासंदर्भात खामगाव येथील पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली होती की, ३० डिसेंबर २०१७ रोजी फिर्यादी शेतात काम करीत असताना पीडित मुली (वय १०) ची मैत्रीण त्यांच्याकडे गेली. वर्गशिक्षक सोहेल अब्दुल रऊफ पठाण (२७, रा. कटकटगेट, औरंगाबाद) हा वर्गातील इतर मुलांना डोळे बंद करायला लावून पीडित मुलीला पाठीमागच्या बाकावर बसवून तिच्याशी लैंगिक चाळे करतो, करायला लावतो व असा प्रकार त्याने अनेकदा केला, असे सांगितले.
फिर्यादीने मुलीला विश्वासात घेऊन विचारले असता, वर्गशिक्षक सोहेलने असा प्रकार चारदा केल्याचे तिने सांगितले. विरोध केल्यावर सोहेल पाठीवर चापटीने मारहाण करीत असल्याचेही तिने सांगितले. फिर्यादीने ८ जानेवारी २०१८ रोजी तक्रार दिल्यावरून भादंविच्या कलम ३५४, ३५४ (अ) सहबाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या (पोस्को) कलम ८ व १२ अन्वये वडोदबाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पीडित मुलगी, तिची आई व साक्षीदार फितूर
खटल्याच्या सुनावणीच्या वेळी सहायक सरकारी वकील कैलास पवार यांनी ११ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. यात डॉक्टराची साक्ष महत्त्वाची ठरली. मात्र सुनावणीदरम्यान पीडित मुलगी, तिची आई व तीन मैत्रिणी असे ५ साक्षीदार फितूर झाले. सुनावणीअंती बाललैंगिक अत्याचार सिद्ध झाल्यामुळे न्यायालयाने आरोपीला भादंवि कलम ३५४ अन्वये पाच वर्षे सश्रम कारावास आणि एक हजार रुपये दंड ठोठावला. तसेच कलम ३२३ अन्वये एक वर्ष सश्रम कारावास आणि पाचशे रुपये दंड, ‘पोस्को’कायद्याच्या कलम ६ अन्वये १४ वर्षे सश्रम कारावास आणि दोन हजार रुपये दंड , कलम ८ अन्वये पाच वर्षे सश्रम कारावास आणि एक हजार रुपये दंड आणि कलम १२ अन्वये तीन वर्षे सश्रम कारावास आणि एक हजार रुपये दंड ठोठावला.