औरंगाबाद जिल्ह्यातील १४ हजार मतदारांना वगळायचे आहे यादीतून नाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2021 11:28 AM2021-12-05T11:28:16+5:302021-12-05T11:30:01+5:30
दोन हजार मतदारांना बदलायचा आहे वॉर्ड, मतदारसंघ
औरंगाबाद : जिल्ह्यातील १४ हजार मतदारांना मतदार यादीतून नाव वगळायचे आहे, तर दोन हजार मतदारांना मतदारसंघ किंवा वॉर्ड बदलून घ्यायचा आहे. ३७ हजार ७५९ नवमतदारांचे अर्ज आले आहेत.
निवडणूक आयोगातर्फे १ जानेवारी २०२२ या पात्रता तारखेवर आधारित संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला असून, यात दावे व हरकती स्वीकारण्याच्या कालावधीस पाच दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. मतदारयादीत नाव नोंदणीसाठी १८ वर्षे पूर्ण झालेल्या ३७ हजार ७५९ जणांनी अर्ज दाखल केले असून, नावासह अन्य दुरुस्तीसाठी सहा हजारच्या वर मतदारांनी अर्ज सादर केल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली.
२०२२ मध्ये मुदत संपणाऱ्या महानगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी भारत निवडणूक आयोगातर्फे १ जानेवारी २०२२ या अर्हता तारखेवर पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. त्या कार्यक्रमावर ५ डिसेंबर २०२१ पर्यंत दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहेत. २० डिसेंबरपर्यंत हरकती निकाली काढण्यात येतील. ५ जानेवारी २०२२ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. तीच अंतिम मतदारयादी २०२२ मध्ये होणाऱ्या महानगरपलिका, नगरपरिषदा, नगरपंचायती आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती सार्वजनिक निवडणुकीसाठी वापरण्यात येणार आहे.
नवीन मतदार होण्यासाठी किती जणांचे अर्ज
नवीन नाव नोंदणीसाठी एकूण ३७ हजार ७५९ अर्ज दाखल झाले आहेत. यात सर्वाधिक सहा हजार ५५१ अर्ज कन्नडमधून झाले, तर सिल्लोडमधून तीन हजार ५२३, फुलंब्री तीन हजार ६५६, औरंगाबाद मध्यमधून तीन हजार २८२, औरंगाबाद पश्चिम तीन हजार ७६८, पूर्व एक हजार ८९१, पैठण पाच हजार ९४६, गंगापूर पाच हजार २७१, तर वैजापूरमधून तीन हजार ८७१ अर्ज प्राप्त झाले आहेत.
कोणता फॉर्म कशासाठी :
- फार्म ६ नुसार हे अर्ज आले आहेत. नवीन नाव नोंदणीसाठी एकूण ३७ हजार ७५९ अर्ज आले आहेत.
- फॉर्म ७ नुसार मतदार यादीतून नाव वगळण्यासाठी जिल्ह्यातून एकूण १४ हजार १९ अर्ज आले आहेत.
- फॉर्म ८ नुसार नावासह दुरुस्तीसाठी सहा हजार २० अर्ज आले आहेत.
- फॉर्म ८ (अ)नुसार स्थलांतरबाबतचे दोन हजार १२ अर्ज प्राप्त आले आहेत.