खरिपात १४२ कोटींची उलाढाल
By Admin | Published: May 22, 2016 12:19 AM2016-05-22T00:19:22+5:302016-05-22T00:35:21+5:30
औरंगाबाद : मागील तीन वर्षांत कपाशीने अपेक्षित उत्पन्न न मिळवून दिल्याने शेतकऱ्यांचा कल यंदा मूग, तूर, मका बियाणे खरेदीकडे दिसून येत आहे.
औरंगाबाद : मागील तीन वर्षांत कपाशीने अपेक्षित उत्पन्न न मिळवून दिल्याने शेतकऱ्यांचा कल यंदा मूग, तूर, मका बियाणे खरेदीकडे दिसून येत आहे. परिणामी बीटी बियाणाच्या किमती ३० रुपयांनी उतरल्या आहेत, तर डाळींचे गगनाला भिडलेले भाव लक्षात घेता कंपन्यांनी मूग, तूर बियाणांचे भाव दुप्पट करून टाकले आहे. यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात बी-बियाणे विक्रीत १४२ कोटींची उलाढाल होईल, असा होरा बियाणे विक्रेत्यांनी व्यक्त केला आहे.
यंदा समाधानकारक पाऊस पडणार असल्याचा हवामान खात्याने अंदाज वर्तविल्याने बळीराजासह सर्वांना दिलासा मिळाला आहे. एकीकडे उत्साहात शेतकऱ्यांनी खरीपपूर्व मशागतीला सुरुवात केली असून, दुसरीकडे बी-बियाणे बाजारपेठेत कंपन्यांनी बियाणांचा मुबलक पुरवठा केला आहे. व्यापारी आता बळीराजाची प्रतीक्षा करीत आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात ९० टक्के क्षेत्र हे कोरडवाहू आहे. या क्षेत्रात कपाशीचे उत्पादन चांगले होत आहे. अनेक शेतकऱ्यांनी कपाशीचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. मात्र, सततच्या दुष्काळामुळे कपाशीला त्याचा मोठा फटका बसला आहे. यामुळे कपाशीचे नगदी पीक असले तरी शेतकरी कपाशीपासून दोन हात दूर राहण्याच्या मन:स्थितीत सध्यातरी आहे. परिणामी, बीटी बनविणाऱ्या कंपन्यांनी बीटीच्या किमती ४५० ग्रॅम पाकीट मागे ३० रुपयांनी कमी केले आहे. सध्या ८०० रुपयास बीटी २ चे बियाणे विक्री होत आहे. एककाळ असा होता की, पोलीस संरक्षणात बीटी बियाणे विक्री होत, असे पण सध्या मुबलक प्रमाणात बीटी वाण उपलब्ध आहे. दुसरीकडे बाजारात डाळींचे भाव १०० ते १५० रुपये किलोपर्यंत जाऊन पोहोचले आहे. यामुळे यंदा डाळींचे बियाणे खरेदी करावे, असा विचार शेतकरी करीत आहेत. मात्र, बियाणांच्या किमती कंपन्यांनी दुपटीने वाढविल्या आहेत. मूग ७००० ते ७५०० रुपये, तूर ८००० ते ८५०० रुपये व उडीद १०००० ते ११००० रुपये प्रतिक्विंटल बियाणे विकल्या जात आहे, तर दुसरे महत्त्वाचे पीक मकाचे बियाणे ७०० ते १ हजार रुपये बॅग विकली जात आहे, अशी माहिती जिल्हा कृषी साहित्य विक्रेता संघटनेचे अध्यक्ष राकेश सोनी यांनी दिली.
जगन्नाथ काळे यांनी सांगितले की, जिल्ह्यात बीटी बियाणाचे १० ते १२ लाख पाकीट विक्री होतात. सुमारे ९० कोटींची उलाढाल यात होते. मका बियाणात २० ते २५ कोटी, तूर बियाणे १५ कोटी, बाजरी ५ कोटी, मूग ५ कोटी तर उडीद बियाणात २ कोटी, अशी एकूण १४२ कोटींची उलाढाल या हंगामात अपेक्षित आहे. मृग नक्षत्रात पाऊस पडला तरच मूग बियाणाची विक्री वाढेल.