विद्यापीठात प्राध्यापकांच्या ७३ पदांच्या भरतीसाठी पोस्टाद्वारे आले १५ पोती अर्ज
By विजय सरवदे | Published: September 22, 2023 01:51 PM2023-09-22T13:51:14+5:302023-09-22T13:51:30+5:30
सुमारे १५ वर्षांनंतर यंदा विद्यापीठात प्राध्यापक भरती होत आहे.
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्राध्यापकांच्या ७३ पदांसाठी भरती होणार आहे. यासाठी प्राप्त अर्जांच्या गठ्ठ्यांनी आस्थापना विभागाशेजारील कक्ष अक्षरश: खचाखच भरला आहे. दरम्यान, गुरूवारी शेवटच्या दिवशी अर्जांची हार्ड कॉपी सादर करण्यासाठी उमेदवारांची विद्यापीठात मोठी गर्दी झाली होती. तर पोस्टाच्या कर्मचाऱ्यांनी तब्बल १५ पोती भरून अर्ज विद्यापीठाच्या स्वाधीन केले आहेत.
सुमारे १५ वर्षांनंतर यंदा विद्यापीठात प्राध्यापक भरती होत आहे. विविध विभागांमधील ७३ जागांसाठी ऑगस्टमध्ये जाहिरात देण्यात आली होती. २३ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर दरम्यान ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले, तर २१ सप्टेंबर हा अर्जाची हार्ड कॉपी दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. शेवटच्या दोन दिवसात उमेवारांनी हार्ड कॉपी सादर करण्यासाठी विद्यापीठात मोठी गर्दी केली होती. प्राप्त अर्जांच्या हार्ड काॅपींनी आस्थापना विभागाशेजारील कक्ष खचाखच भरला असून, कुलसचिव डॉ. भगवान साखळे यांनी सायंकाळी याबाबतचा आढावा घेतला.
नियोजित वेळ संपल्यावर सायंकाळनंतर हा कक्ष सील करण्यात आला. अर्जांचे गठ्ठे व्यवस्थित ठेवण्यासाठी अधिकारी- कर्मचाऱ्यांनी दिवसभर परिश्रम घेतले. या भरती प्रक्रियेसाठी उपकुलसचिव दिलीप भरड, कक्ष अधिकारी आर. आर. चव्हाण, संजय वाघ, रत्नाकर मुळे व सहकारी प्रयत्नशील आहेत. भरतीसंदर्भात विद्यापीठाच्या संकेस्थळावर अधिक माहिती उपलब्ध करून देण्यात येईल, असे कुलसचिव डॉ. साखळे यांनी सांगितले.
सर्वाधिक केमिस्ट्री, बॉटनीसाठी अर्ज
विद्यापीठातील प्राध्यापक भरतीसाठी केमिस्ट्री, बॉटनी आणि त्याखालोखाल फिजिक्स, झूलॉजी, मराठी आणि इंग्रजी या विषयांसाठी मोठ्या प्रमाणात उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत तर पर्यटनशास्त्र, जर्मन, उर्दू, इतिहास, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, वृत्तपत्र विद्याभ्यास, शिक्षणशास्त्र या विषयांसाठी अल्प प्रमाणात अर्ज प्राप्त झाले आहेत.