गाळे गहाण ठेवून घेतले १५ कोटींचे कर्ज
By Admin | Published: May 20, 2017 12:40 AM2017-05-20T00:40:00+5:302017-05-20T00:42:29+5:30
लातूर : मनपाच्या मालकीचे गाळे असताना भाडेकरूने गहाण ठेवून बँकेकडून १५ कोटी रुपयांचे कर्ज घेतले.
लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : मनपाच्या मालकीचे गाळे असताना भाडेकरूने गहाण ठेवून बँकेकडून १५ कोटी रुपयांचे कर्ज घेतले. याबाबतची माहिती, माहिती अधिकारात मागितल्यानंतर मनपाचे डोळे उघडले असून, संबंधित भाडेकरूस कागदपत्र तत्काळ महापालिकेत जमा करावीत, अशी नोटीस बजावली आहे.
यशवंतराव चव्हाण कॉम्प्लेक्सच्या पूर्व भागात बांधण्यात आलेल्या संकुलात १५ गाळे चंद्रकला व्यंकटराव पाटील यांना मनपाने भाड्याने दिली आहेत. तळमजल्यात गाळा क्र. १ ते ५, पहिल्या मजल्यात गाळा क्र. १ ते ५ आणि दुसऱ्या मजल्यावर १ ते ५ असे १५ गाळे मनपाने पाटील यांना दिले आहेत. संबंधित भाडेकरूने २३ फेब्रुवारी २०१५ रोजी बँकेकडून व्यवसायासाठी १५ कोटी रुपये कर्ज घेण्यासाठी हे गाळे गहाण ठेवून सहमती द्यावी, असे पत्र महापालिकेला दिले. या पत्रानुसार महापालिकेने ३० मार्च २०१५ रोजी नाहरकत पत्र दिले. मात्र त्यावेळी ज्या बँकेकडून कर्ज घेतले आहे, त्यासंदर्भातील कागदपत्रे तसेच दुय्यम निबंधक कार्यालयात दस्तावेज तयार केल्यास त्याच्या छायांकित प्रती महापालिकेत तीन दिवसांच्या आत द्याव्यात, असे सूचित केले होते. मात्र त्या संबंधित भाडेकरूने दिले नाहीत. माहिती अधिकारातील कार्यकर्ते मल्लिकार्जुन भाईकट्टी यांनी मनपाकडे वरील गाळे कोणत्या बँकेत गहाण ठेवून कर्ज घेतले आहे का, अशी माहिती मागितली असता ही बाब उघडकीस आली आहे.
वास्तविक पाहता मनपाच्या मालकीचे गाळे भाड्याने दिले, त्यावर भाडेकरूला कर्ज काढण्याचा अधिकार नाही. तसा नियमही नाही. परंतु, मनपाने डोळे झाकून नाहरकत प्रमाणपत्र दिले. मात्र आता मनपाने संबंधित भाडेकरू चंद्रकला व्यंकटराव पाटील यांना नोटीस पाठविली असून, गाळे व्यवसाय करण्यासाठी गहाण टाकले असल्यास दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्तावेजाची छायांकित प्रत तीन दिवसांच्या आत मनपा कार्यालयात जमा करण्यासाठी कळविण्यात आले होते. आपण याबाबत कोणताही खुलासा सादर केला नाही. तरी पुन्हा आपणास कळविण्यात येते की, उपरोक्त कागदपत्रे महापालिकेस तात्काळ आठ दिवसांच्या आत सादर करावीत. सदर प्रकरणी कायदेशीर पेच निर्माण झाल्यास ती जबाबदारी व्यक्तिगतरीत्या आपल्यावर असेल, अशी नोटीस पाठविली आहे.