औरंगाबादमध्ये दीड कोटी रुपयांच्या राख्या बाजारात; राज्यासह परराज्यातूनही झाली आवक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 05:49 PM2018-08-25T17:49:44+5:302018-08-25T17:50:27+5:30
राज्यातून व परराज्यांतून सुमारे दीड कोटी रुपयांच्या राख्या शहरातील बाजारात दाखल झाल्या आहेत.
औरंगाबाद : भाऊ व बहिणीच्या स्नेहाचे प्रतीक असलेला राखी पौर्णिमा सण अवघ्या एक दिवसावर येऊन ठेपला आहे. शहरात ठिकठिकाणी स्टॉलमध्ये असलेल्या राख्यांमधून लाडक्या भाऊरायासाठी मनपसंत राखी शोधताना बहिणी दिसून येत आहेत. राज्यातून व परराज्यांतून सुमारे दीड कोटी रुपयांच्या राख्या बाजारात दाखल झाल्या आहेत.
शहरात मुंबईहून फॅन्सी राख्या, कोलकाताहून पारंपरिक राख्या, तर अहमदाबादहून स्टोन, मोती, दोऱ्याच्या राख्या विक्रीसाठी आल्या आहेत. शहरातील मुख्य बाजारपेठा गुलमंडी, औरंगपुरा, मछलीखडक तसेच शहागंज, जवाहर कॉलनी, पुंडलिकनगर, आविष्कार कॉलनी, टीव्ही सेंटर, शिवाजीनगर या भागात असंख्य स्टॉल लागले आहेत. तसेच गल्लीबोळातही किराणा दुकानावर राख्या विक्रीसाठी आल्या आहेत. १३ व्यापारी ठोक व्यवसाय करतात, तर शेकडो किरकोळ व्यापारी त्यांच्याकडून राख्या घेऊन ते ग्राहकांना विकतात.
छोट्याछोट्या हातगाड्यावरही असंख्य राख्या लटकविलेल्या दिसून येत आहेत. बहिणी आपल्या लाडक्या भाऊरायासाठी शेकडो राख्यांमधून मनपसंत राखी निवडताना दिसून येत आहेत. तेजपाल जैन या होलसेल विक्रेत्यांनी सांगितले की, यंदा दीड कोटी रुपयांच्या राख्या बाजारात आल्या आहेत. यात अवघ्या ६ रुपये डझनपासून ते १८०० रुपये डझनपर्यंतच्या राख्या आहेत. अहमदाबादहून आलेल्या डायमंड स्टोनच्या राखी १५० रुपयांना एक नग मिळत आहे. साधारणत: शहरात २० रुपये ते ५० रुपयांपर्यंतच्या राख्या जास्त प्रमाणात विकल्या जातात. यंदा स्टोन, डायमंड, मोत्यांनी सजविलेल्या राख्यांना सर्वाधिक पसंती मिळत आहे.
याशिवाय खास वहिनीसाठी कडा आणि त्यास लटकन असलेल्या राखीला पूर्वी जैन, मारवाडी समाजातून मागणी असो; पण आता उत्तर प्रदेशातील, बिहारमधील तसेच मराठी लोकही या राखी खरेदी करताना दिसून येत आहेत. लहान मुलांसाठी कार्टून पात्र असलेली राखी, स्पिनर राखी, म्युझिक राखी खास करून खरेदी केली जात आहे. तसेच घरातील देव-देवतांच्या मूर्ती, वाहन, पेन यांना बांधण्यासाठीही ‘देव’ राखी आवर्जून खरेदी केली जाते. अवघ्या १ रुपये डझनपासून या राखी मिळत आहेत. याशिवाय ‘माय ब्रदर’, ‘आय लव्ह यू भय्या’, असे लिहिलेल्या स्टीलच्या राख्याही नावीन्यपूर्ण ठरत आहेत.
पुन्हा स्पंजच्या राख्या
२० वर्षांपूर्वी स्पंजच्या राख्यांची क्रेझ होती. मोठ्यात मोठी स्पंजची राखी घालणे प्रतिष्ठेचे समजले जात होते; पण २००० पासून आकाराने लहान-नाजूक राखी खरेदीकडे बहिणींचा ओढा वाढला. आजही अशा राख्या बाजारात मोठ्या प्रमाणात आहेत. आधुनिकतेच्या ओघात गायब झालेल्या स्पंजच्या राख्या आता पुन्हा अवतरल्या आहेत.
राखीवर अवतरला भाऊराया
आधुनिक राख्यांमध्ये आता चक्क आपला लाडका भाऊरायाच राखीवर अवतरलेला पाहण्यास मिळत आहे. भावाचा फोटो असलेली राखी सध्या बहिणींची पहिली पसंत ठरत आहे. आपल्या भावाचा फोटो व्हॉटस्अपद्वारे दुकानदाराला दिला जात आहे. त्यावरून दुकानदार राख्यांवर तो फोटो स्कॅनकरून देत आहेत, अशा राख्यांना यंदा चांगली मागणी असल्याचे दिसून येत आहे.