बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या पितापुत्रांच्या वारसास प्रत्येकी १५ लाखांची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:06 AM2021-01-20T04:06:37+5:302021-01-20T04:06:37+5:30
१६ नोहेंबर २०२० रोजी शेतात काम करीत असताना बिबट्याने हल्ला करून आपेगाव येथील अशोक औटे व कृष्णा औटे या ...
१६ नोहेंबर २०२० रोजी शेतात काम करीत असताना बिबट्याने हल्ला करून आपेगाव येथील अशोक औटे व कृष्णा औटे या पितापुत्राला ठार केले होते.
वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात ठार झालेल्यांंच्या कुटुंबांना वन खात्याच्या वतीने आर्थिक मदत दिली जाते. अशोक औटे व कृष्णा औटे यांच्या मदतीचा प्रस्ताव वन परिक्षेत्र अधिकारी शशिकांत तांबे, वन परिमंडळ अधिकारी मनोज कांबळे यांनी राज्य शासनाकडे पाठवून तो मंजूर करून घेतला. प्रत्येकी १५ लाख रुपयांची आर्थिक मदत अशोक व कृष्णा औटे यांना मंजूर झाली. सोमवारी अशोक औटे यांचा मोठा मुलगा बळिराम अशोक औटे यांना आर्थिक मदतीचे धनादेश वनरक्षक राजू जाधव यांनी सुपूर्द केले. यावेळी संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रल्हाद तात्या औटे, युवराज औटे, नितीन खंडागळे, बापू औटे, प्रवीण औटे, आदी नागरिक उपस्थित हाेते.
बिबट्याची दहशत मात्र कायम
आपेगाव शिवारात दोघांचा बळी घेणाऱ्या बिबट्यास पकडण्यासाठी वनखात्याने प्रयत्नांची शिकस्त केली. मात्र, बिबट्यास जेरबंद करण्यात वनखात्यास अपयश आले आहे. दुसरीकडे बिबट्याचे वारंवार परिसरात ग्रामस्थांना दर्शन होत असल्याने शेतशिवार व पंचक्रोशीतील गावांत मात्र बिबट्याची दहशत अजूनही कायम आहे.