मराठवाड्यातील १५ लाख शेतकऱ्यांना पावसाचा फटका; तब्बल ३ हजार ६७५ गावे बाधित
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2024 07:41 PM2024-09-05T19:41:19+5:302024-09-05T19:42:20+5:30
मराठवाड्यातील तब्बल १२ लाख ४१ हजार हेक्टरवरील पिके पाण्यात गेल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे
छत्रपती संभाजीनगर : मागील तीन दिवसांपासून मराठवाड्यात सुरू असलेल्या पावसामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ३ हजार ६७५ गावांतील सुमारे १५ लाख ६१ हजार ७१ शेतकऱ्यांना मुसळधार पावसाचा फटका बसला. यात सर्वाधिक ९५ टक्के जिरायत क्षेत्रफळ आहे. १२ लाख ४१ हजार ९६७ हेक्टरवरील पिके सध्या पाण्यात आहेत.
लहान-मोठी मिळून ६०९ जनावरे दगावली आहेत. तर १२ जणांचा मृत्यू वीज पडून, पुरात वाहून झाला आहे. १ हजार २२२ कच्च्या घरांची पडझड झाली आहे. तर ११५ पक्की घरे पावसामुळे बाधित झाली आहेत. १३२ जनावरांचे गोठे पावसामुळे वाहून गेले आहेत. मराठवाड्यात १ सप्टेंबरपासून झालेल्या पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झाले आहे. ३ सप्टेंबर रोजी झालेल्या पावसामुळे १ लाख हेक्टरवर नुकसान झाले. शेतीसह इतर नुकसानीचे पंचनामे करण्याची प्रक्रिया विभागीय महसूल व कृषी यंत्रणेने हाती घेतली आहे. विधानसभा निवडणुका तोंडावर असल्यामुळे राजकीय नेत्यांचे नुकसान पाहणीचे दौरे लागोलाग सुरू झाले आहेत.
जिल्हा........... बाधित शेतकरी .......... शेतीचे नुकसान हेक्टरमध्ये
छत्रपती संभाजीनगर......६४६९१...........४५०७२
जालना.................२५७४३५..............२३२९७२
परभणी..................४२८२२३............२८७८९२
हिंगोली..................२७६११८..............२५८८९८
नांदेड..............४४१३४४.................३३४९८५
बीड.................८४६१८.............७६१९४
लातूर..............८६४२...............५९५३
धाराशिव .............००००...........००००
एकूण...............१५६१०७१.............१२४१९६७