बँकेच्या संचालक मंडळावर घेण्याचे आमिष देऊन महिला वकिलास १५ लाखाला फसवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2021 07:12 PM2021-12-25T19:12:30+5:302021-12-25T19:13:42+5:30
सिडको एमआयडीसी ठाण्यात गुन्हा दाखल : आरोपीकडून अनेकांची फसवणूक
औरंगाबाद : बचत गटाच्या नावाखाली सुमारे दीडशे महिलांची फसवणूक करणाऱ्या विकास रामभाऊ मुळे (रा. जटवाडा कॉलनी, हर्सूल) याने एका महिला वकिलाची १५ लाख ७९ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
फिर्यादीनुसार, न्यायनगरातील महिला वकिलाची न्यायालयीन खटल्यामुळे आरोपी मुळेसोबत ऑगस्ट २०२०मध्ये ओळख झाली होती. मुळेने सांगितले की, त्याची राजमाता इंटरप्राईजेस नावाची फर्म असून, या संस्थेच्या माध्यमातून ते राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ बचत गटाच्या गरजू महिलांना देतात. राजमाता महिला अर्बन निधी नावाची बँक नोंदणीकृत आहे. त्याकरिता तुम्ही १४ लाख रुपये चार ते पाच महिन्यांकरिता हातउसने द्या, अशी मागणी केली. फिर्यादीचा मुळेसोबत परिचय असल्यामुळे आणि त्यास राजमाता इंटरप्राइजकरिता संगणक खरेदीसाठी पैशांची आवश्यकता होती. त्यामुळे त्यास दोन महिलांच्या समक्ष ४ लाख रुपये रोख दिले. १९ नोव्हेंबर २०२० रोजी मुळे याने फिर्यादीसह नातेवाईकांना बँकेमध्ये नोकरी लावून देताे, अशी थाप मारून ६ लाख ५० हजार रुपयांची मागणी केली. तसेच राजमाता महिला अर्बन निधी बँकेच्या संचालक मंडळावर घेण्याचे आमिष दाखविले.
तेव्हा फिर्यादीने आई, भावाचे सोने तारण ठेवून त्यास पैसे दिले. पण मुळेने फिर्यादीची संचालक मंडळावर नेमणूक केली नाही. नातेवाईकांना नोकरीही दिली नाही. नोव्हेंबर २०२०मध्ये त्याने शेअर ट्रेडिंगमधून मोठ्या प्रमाणात नफा मिळतो. त्यासाठी अत्याधुनिक कार्यालय सुरु करण्यासाठी मुळेने पैशांची मागणी केली. तेव्हा फिर्यादीने त्यास तीन जणांचे क्रेडिट कार्ड दिले. त्यातून त्याने तिन्ही क्रेडिट कार्डमधून ३ लाख ६२ हजार रुपये खर्च केले. त्यानंतर फिर्यादीने अनेकवेळा पैशांची मागणी केली. मात्र, त्याने टाळाटाळ सुरू केली. त्याने दोन लाख रुपयांचे धनादेश दिले आहेत. मात्र, उर्वरित रक्कम देत नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यामुळे वकील महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेतली. गुन्हा नोंदवून उपनिरीक्षक संजय मांटे तपास करीत आहेत.