जनधन खात्यात अचानक जमा झाले १५ लाख; आनंदात शेतकऱ्याने बांधले घर पण...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2022 12:32 PM2022-02-08T12:32:37+5:302022-02-08T12:34:41+5:30
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीच पैसे जमा केल्याचे समजून आनदांत शेतकऱ्याने घर बांधून काढले.
औरंगाबाद : सर्व भारतीयांच्या खात्यात १५ लाख रुपये जमा होणार, हे २०१४ च्या लोकसभा निवडणूक पूर्व लोकप्रिय आश्वासन केवळ प्रचाराचा भाग असल्याचे आता सर्वांच्या लक्षात आले आहे. परंतु, एका शेतकऱ्यासाठी आश्चर्यकारकरित्या ही घोषणा सत्यात उतरली. पैठण तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या खात्यात काही दिवसांपूर्वी अचानक १५ लाख रुपये जमा झाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi ) यांनीच पैसे जमा केल्याचे समजून आनदांत शेतकऱ्याने घर बांधून काढले. मात्र, काही दिवसांनी एक वेगळाच गोंधळ पुढे आला. आता बँक, जिल्हा परिषद या शेतकऱ्याकडे पैसे परत करण्याची विनंती करत आहे.
विदेशातून काळापैसा आणून देशातील प्रत्येक नागरिकांच्या खात्यात १५ लाख रुपये करणार, असे आश्वासन भाजपकडून नरेंद्र मोदी यांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत दिले होते. सत्तेत आल्यानंतर मात्र १५ लाख रुपयांचे केवळ आश्वासन असल्याचे सर्वांच्या लक्षात आले आहे. यावरून विरोधक आजही भाजपवर टीका करत असतात. मात्र, पैठण तालुक्यातील दावरवाडी येथील शेतकरी ज्ञानेश्वर औटे यांच्या बँक ऑफ बडोदा शाखेतील जनधन खात्यात काही महिन्यांपूर्वी अचानक १५ लाख रुपये जमा झाले. औटे यांना काही तरी चूक झाली असेल पैसे पुन्हा वळती होतील असे वाटले. मात्र, बरेच दिवस वाट पाहूनही पैसे वळती झाले नाहीत. त्यामुळे औटे यांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीच हे पैसे जमा केल्याचे वाटले. शेतकऱ्याने पंतप्रधान कार्यालयाला पैसे मिळाल्याचा आभाराचा मेल पाठवत खात्यातून ९ लाख रुपयांच्यावर पैसे काढून घर बांधले.
दरम्यान, पिंपळवाडी ग्राम पंचायतीच्या खात्यात जमा करायचे १५ लाख रुपये चुकून ज्ञानेश्वर यांच्या खात्यात जमा झाल्याचे बँक ऑफ बडोदाच्या कर्मचाऱ्यांना नंतर लक्षात आले. कर्मचाऱ्यांनी लागलीच ज्ञानेश्वर यांच्या खात्यातून उरलेली रक्कम वळती करून घेतली. आता बँक ज्ञानेश्वर औटे यांच्याकडे उरलेले पैसे बँकेला परत करण्याची विनंती करीत आहे.