१५ वर्षांचे अतिक्रमण क्षणार्धात जमीनदोस्त; सिडकोतील सांख्यिकी कार्यालय परिसरात कारवाई
By मुजीब देवणीकर | Published: March 14, 2024 03:24 PM2024-03-14T15:24:40+5:302024-03-14T15:25:03+5:30
मूळ जागेपेक्षा सहा फूट पार्किंगच्या समोरील जागेत आरसीसी स्लॅब टाकून दुकाने काढली होती. त्यांनी ही दुकाने भाड्याने दिली
छत्रपती संभाजीनगर : सिडको एन-७ येथील सांख्यिकी कार्यालयाच्या परिसरात सिडको प्रशासनाने १५ वर्षांपूर्वी काही प्लॉटची विक्री केली होती. प्लॉटधारकांनी अनधिकृतपणे बांधकाम केले होते. मंगळवारी महापालिका आणि सिडकोच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त कारवाई करीत अनधिकृत बांधकाम क्षणार्धात जमीनदोस्त केले.
वैभव घडामोडे आणि त्यांच्या बंधूने या जागेत अतिक्रमण केले होते. जानेवारी २०२४ मध्ये पंचनामा करून मार्किंग करण्यात आली होती. घडामोडे यांनी १५ बाय १५ आणि १० बाय १० अशा दोन खोल्या बांधून व्यावसायिक वापर सुरू केला होता. याशिवाय त्यांचे दुसरे बंधू यांनी प्रिंटिंग प्रेसचा व्यवसाय सुरू केला होता. मूळ जागेपेक्षा सहा फूट पार्किंगच्या समोरील जागेत आरसीसी स्लॅब टाकून दुकाने काढली होती. त्यांनी ही दुकाने भाड्याने दिली होती.
यामध्ये चहाचे दुकान, पान टपरी इ. अतिक्रमणे होती. मागील १५ वर्षांपासून हे अतिक्रमण होते. मंगळवारी प्रशासक जी. श्रीकांत यांच्या आदेशाने अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त सविता सोनवणे, अतिक्रमण निरीक्षक सय्यद जमशेद, सिडको उपअभियंता उदयराज चौधरी, सर्व्हेअर मीलन खिल्लारे, अतुल मोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.