दीडशे वर्षांची तखतरावची परंपरा दोन वर्षांपासून खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:02 AM2021-09-08T04:02:16+5:302021-09-08T04:02:16+5:30

फुलंब्री : शहरासह तालुक्यातील बाबरा येथील पाडवा उत्सवात गेल्या दीडशे वर्षांपासून जोपासली जाणारी तखतराव या सांस्कृतिक कार्यक्रमाची परंपरा गेल्या ...

The 150-year-old tradition of Takhtarao has been broken for two years | दीडशे वर्षांची तखतरावची परंपरा दोन वर्षांपासून खंडित

दीडशे वर्षांची तखतरावची परंपरा दोन वर्षांपासून खंडित

googlenewsNext

फुलंब्री : शहरासह तालुक्यातील बाबरा येथील पाडवा उत्सवात गेल्या दीडशे वर्षांपासून जोपासली जाणारी तखतराव या सांस्कृतिक कार्यक्रमाची परंपरा गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे खंडित झालेली आहे.

फुलंब्री तालुक्यातील फुलंब्रीशिवाय बाबरा येथे पाडवा उत्सवात कलगीतुरा गीतावर आपल्या नृत्याचे प्रदर्शन करीत असलेल्या चार लोकांचा समूह म्हणजे तखराव होय. परिसरात गेल्या दीडशे वर्षांपासून ही परंपरा जोपासली जाते. फुलंब्री गावात तीन वेशी आहेत. या वेशीतून तीन पोळे फुटतात. शिवाय पाडव्याला प्रत्येक वेशीतील तखतराव असतात. पूर्वी एका वेशीतून पाच ते सहा तखतराव निघायचे; पण गेल्या काही वर्षांपासून या तखतरावच्या संखेत घट होत आहे. २०१९ मध्ये एका वेशीतून केवळ एक किवा दोन तखतराव निघाले. प्रत्येक वेशीला पंच कमिटी असून, ती कमिटी तखतरावांना आर्थिक मदत करीत असे. आता ही पंच कमिटी अस्तित्वात नसल्यामुळे तखतरावांना लागणारा खर्च करायला कोणी तयार नाही, त्यामुळे दिवसेंदिवस तखतरावांची संख्या कमी होत आहे.

चौकट

पंडित नेहरुंनी १९५७ साली दिली होती भेट

फुलंब्री येथील या पोळ्याची ख्याती सर्वत्र पसरलेली आहे. १९५७ साली देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनीही खास करून पोळ्याच्या दिवशी येथे भेट दिली होती. तेव्हापासून फुलंब्रीचे नाव देशपातळीवर पोहोचले होते.

चौकट...

तखतराव म्हणजे काय

पोळा सणाच्या दुसऱ्या दिवशी येणाऱ्या पाडव्यालाही फुलंब्री परिसरात अधिक महत्त्व आहे. याचे खास आकर्षण म्हणजे बैलगाडीवर लाकडी फळ्या टाकून स्टेज तयार केले जाते. या स्टेजवर कलगीतुऱ्याच्या गीतावर नृत्य करणारी नृत्यांगना असते, तर तिला गायनासाठी चार लोक मदत करतात, त्यांना तखतराव म्हणतात. नृत्याची ही परंपरा दीडशे वर्षांपूर्वीपासून आहे.

सांस्कृतिक परंपरा लोप पावत चालली

फुलंब्री शहरातील या तखतरावची सांस्कृतिक परंपरा गेल्या पंधरा, सोळा वर्षांपासून कमी होत चालली आहे. तत्पूर्वी २५ तखतराव कलाप्रदर्शन करायचे. आता संख्येत घट होऊन ही संख्या केवळ चारवर आली आहे. जुन्या पिढीतील काही लोक ही परंपरा जपून आहेत. पण नवीन पिढी मोबाइलमध्ये मश्गुल राहत असल्याने तखतरावची मिरवणूक निघाल्यानंतरही होणाऱ्या गर्दीचे प्रमाण कमी राहत आहे. गेल्या दोन वर्षांपासून तर ही परंपराच कोरोनामुळे खंडित झाली आहे.

Web Title: The 150-year-old tradition of Takhtarao has been broken for two years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.