आइस्क्रीम उद्योगाला 15 हजार कोटींचा फटका; लॉकडाऊनमुळे देशातील आइस्क्रीम उद्योग वितळला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2021 05:56 AM2021-05-01T05:56:09+5:302021-05-01T06:00:03+5:30
देशात गुजरातमध्ये आइस्क्रीमची सर्वाधिक विक्री होते. दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र, नवी दिल्ली तिसऱ्या क्रमांकावर, राजस्थान चौथ्या तर पाचव्या क्रमांकावर कर्नाटकचा नंबर लागतो.
प्रशांत तेलवाडकर
औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या लॉकडाऊनमुळे देशभरातील लहान-मोठे जवळपास १२ हजार आइस्क्रीम उत्पादक आर्थिक संकटात सापडले आहेत. यामुळे सुमारे १५ हजार कोटींचा आर्थिक फटका या उद्योगाला बसला आहे. यात राज्यातील १५०० कोटी, तर त्यात औरंगाबादेतील ७० कोटींचा समावेश आहे.
देशात गुजरातमध्ये आइस्क्रीमची सर्वाधिक विक्री होते. दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र, नवी दिल्ली तिसऱ्या क्रमांकावर, राजस्थान चौथ्या तर पाचव्या क्रमांकावर कर्नाटकचा नंबर लागतो. आइस्क्रीमची विक्री वर्षभर होत असते. पण ‘मार्च ते मे’ ही तीन महिने हंगाम असतो. याच हंगामात लॉकडाऊन होण्याचे हे दुसरे वर्ष आहे.
आइस्क्रीमचा समावेश फूड, डेअरी इंडस्ट्रीमध्ये करावा
देशाच्या एकूण जीडीपीत ५ टक्के हिस्सा डेअरी उद्योगाचा आहे. आइस्क्रीम उद्योगाला लागणारा कच्चा माल जसे दूध, दूध पावडर, क्रीम, बटर, खवा हे डेअरी उद्योगापासून मिळतात. तरीपण जीएसटीमध्ये डेअरी उद्योगाचा समावेश ५ टक्के, तर आइस्क्रीम उद्योगाला १८ टक्केच्या कर वर्गवारीत करण्यात आला आहे. आइस्क्रीम उद्योगाला फूड इंडस्ट्री किंवा डेअरी इंडस्ट्रीमध्ये समाविष्ट करण्यात यावे, अशी मागणी संघटनेने केली आहे.
- अनिल पाटोदी अध्यक्ष, आइस्क्रीम मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन
आइस्क्रीम इंडस्ट्रीच्या मागण्या
लघु, मध्यम व मोठ्या आइस्क्रीम उद्योगासाठी कराची रचना वेगवेगळी असावी.
या उद्योगाला कम्पोझिशन स्कीममध्ये घेण्यात यावे.
उलाढाल ३० टक्क्यांवर येऊन ठेपली आहे. या उद्योगाला उभारी देण्यासाठी शासनाने लॉकडाऊन काळातील वीजबिल माफ करावे.
शून्य टक्के व्याज दराने कर्ज द्यावे किंवा अनुदान द्यावे.