१५०६१ तिरडी बांधणारा डॉक्टर, 'लिम्का बुक आॅफ रेकॉर्ड'मध्ये नोंद
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2017 09:30 PM2017-11-29T21:30:28+5:302017-11-29T21:30:42+5:30
मृत्यूनंतर आपली तिरडी कुणी बांधायची हे एखाद्या व्यक्तीने आपल्या मृत्युपत्रात लिहून ठेवले असेल तर याबाबत अनेकांना आश्चर्य वाटायला नको. कारण, औरंगाबादमधील ८८ वर्षीय डॉ. नवनीत श्रॉफ यांनीच आपल्या मृत्यूनंतर तिरडी बांधावी, असे काहीजण आपल्या मृत्युपत्रात लिहून ठेवत असल्याचे समोर आले आहे.
- प्रशांत तेलवाडकर
औरंगाबाद : मृत्यूनंतर आपली तिरडी कुणी बांधायची हे एखाद्या व्यक्तीने आपल्या मृत्युपत्रात लिहून ठेवले असेल तर याबाबत अनेकांना आश्चर्य वाटायला नको. कारण, औरंगाबादमधील ८८ वर्षीय डॉ. नवनीत श्रॉफ यांनीच आपल्या मृत्यूनंतर तिरडी बांधावी, असे काहीजण आपल्या मृत्युपत्रात लिहून ठेवत असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे गेल्या ७३ वर्षांपासून पेशाने दंतवैद्यकीय व्यावसायिक असलेले डॉ. नवनीत श्रॉफ हे मृत व्यक्तीची तिरडी बांधण्याचे काम नि:स्वार्थपणे करत आहेत.
दुस-यांच्या सुखात नव्हे तर दु:खात सहभागी व्हावे असा सुविचार आहे. हा ८८ वर्षीय डॉ. श्रॉफ यांना तंतोतंत लागू पडतो. ओळखीचे असो वा नसो एखाद्या परिवारातील व्यक्तीचे निधन झाल्याची वार्ता कळताच डॉक्टर त्या दु:खी परिवाराचे सांत्वन करण्यासाठी धावून जातात. एवढेच नव्हे तर तिरडीचे सामान आणणे, ती बांधण्यापासून ते मृतदेहावर सरपण ठेवण्यापर्यंतचा सर्व विधी ते कोणतीही अपेक्षा न ठेवता पार पाडतात. गेल्या ७३ वर्षांत त्यांनी १५०६१ मृत व्यक्तींच्या तिरडी बांधल्या आहेत. आता तर शहरातील काही ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या मृत्युपत्रात 'माझी तिरडी डॉ. नवनीत श्रॉफ यांच्याकडूनच बांधून घ्यावी' असे आवर्जून लिहून ठेवले आहे. उल्लेखनीय म्हणजे, या सेवाव्रतीची नोंद लिम्का बुक आॅफ रेकॉर्डने २००३ मध्ये घेऊन त्यांच्या कार्याला जगात पोहोचविले आहे.
डॉ. नवनीत श्रॉफ यांची जागतिक विक्रमात नोंद झाल्यापासून ते 'तिरडी एक्सपर्ट' म्हणून परिचित झाले आहेत. समाजात आज कोणालाही दु:खी परिवाराचे सांत्वन करण्यास वेळ नाही. अंत्ययात्रेत सहभागी होण्यापेक्षा थेट स्मशानात येणा-यांचेच प्रमाण अधिक असते. तिरडी बांधणे सोडाच पण खांदा देणेही लोक टाळत असतात. एवढेच नव्हे तर 'श्री राम जय राम जय जय राम' किंवा 'रामनाम सत्य है', असा नामोच्चारही मुखातून निघत नाही. अशा विदारक परिस्थितीतही काही सेवाव्रती लोक तिरडी बांधण्यापासून ते मृतदेहावर सरपण ठेवण्यापर्यंतचे कार्य निष्ठेने करीत आहेत.
तिरडी बांधण्याची कला तरुणांनी शिकावी
तिरडी बांधण्यात काही गैर नाही, त्यात भीती बाळगण्याचे काही कारण नाही. यामुळे तरुणांनी आता यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. त्यांना मोफत प्रशिक्षण देण्याचे काम मी करीत आहे. तसेच, तिरडी बांधण्याच्या प्रशिक्षणासाठी काही तरुणीही पुढे येत आहेत. एवढेच नव्हे तर वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या तिरडीला आता मुलीही खांदा देत आहे. हा समाजात होणा-या बदलाचा मी साक्षीदार असल्याचेही डॉ. नवनीत श्रॉफ यांनी सांगितले.
अंत्ययात्रेतच भांडणे
तिरडी बांधताना मृत व्यक्तीचे डोके उत्तर दिशेला ठेवावे की, दक्षिण दिशेला यावरून अनेकदा नातेवाईकांमध्ये भांडणे होताना डॉ. नवनीत श्रॉफ यांनी पाहिले आहे. ते म्हणतात की, तिरडी अशा प्रकारे ठेवली जाते की, मृत व्यक्तीचे डोके उत्तर दिशेला असावे, असे शास्त्रात लिहिले आहे. मात्र, काही जण उगच अर्धवट ज्ञान पाजळत अंत्यविधीत विनाकारण खोडा घालत असतात. प्रत्येक जात, धर्मात कशा प्रकारे तिरडी बांधल्या जाते. याचा मी अभ्यास केला आहे. त्यानुसार तिरडी बांधत असतो. मात्र, अशीच का तिरडी बांधली, असा प्रश्न उपस्थित करून काही जण वाद घालत असतात, अशी लोक स्वत:हून तिरडी बांधण्यास येत नाहीत, हे विशेष.
जागतिक विक्रमासाठी तिरडी बांधत नाही
डॉ. नवनीत श्रॉफ म्हणाले की, मी प्रत्येकाच्या दु:खात सहभागी होत असतो. तिरडी बांधण्यापासून ते पहिल्या दिवसाचा सर्व विधी करीत असतो; पण कोणाकडून कोणतीही अपेक्षा ठेवली नाही. मात्र, ज्याचे निधन झाले त्या परिवाराकडून फॉर्म भरून घेतो. त्यात मृत व्यक्तीचे नाव, पत्ता, वय, कोणत्या आजाराने निधन झाले त्याची माहिती लिहून घेतो. हे माझे कार्य बघून माझ्या मित्रांनी पुढाकार घेतला व २००३ मध्ये लिम्का बुक आॅफ रेकॉर्डमध्ये कार्याची नोंद झाली. तेव्हा ३७०० अंत्ययात्रेत सहभागी होण्याच्या विक्रमाची नोंद झाली होती. मी आत्तापर्यंत १५०६१ अंत्ययात्रेत सहभागी होऊन तिथे तिरडी बांधल्या आहेत. कोणतीही अपेक्षा न ठेवता हे कार्य करीत आहे. कोणत्याही जागतिक विक्रमासाठी हे करीत नसून समाजाचे आपण देणे लागतो हीच त्यामागील भावना आहे.
अनेकदा दिवसभरात चार-चार तिरडी बांधल्या
निधना वार्ता समजली की, मी दवाखाना बंद करून त्या दु:खी परिवाराच्या घरी जातो. अनेकदा दिवसभरात चार-चार अंत्ययात्रेत सहभागी होऊन तिरडी बांधल्या आहेत. तेवढ्या वेळेस घरी येऊन स्नान करून पुन्हा दवाखाना सुरू केला आहे, असेही डॉ. नवनीत शॉफ यांनी सांगितले.
लोक आरोपही करतात
डॉ. नवनीत श्रॉफ यांनी सांगितले की, मी प्रत्येकाच्या दु:खामध्ये सहभागी होत असतो. तिरडी बांधण्याचे कौशल्य असल्याने अवघ्या १० ते १५ मिनिटांत तिरडी बांधतो. मात्र, समाजातील काही लोक माझ्यावर आरोप करतात की, तिरडीचे सामान विकणारे मला कमिशन देत असतात, अशा आरोपामुळे खूप दु:ख होते. वेळप्रसंगी मी माझ्याकडील पैसे देऊन ४ जणांचा अंत्यविधी केला. कोणतीही अपेक्षा ठेवली नाही; पण मी सुद्धा आरोपाकडे दुर्लक्ष करून माझे काम निष्ठेने करीत आहे, असेही ते म्हणाले.
(तिरडी बांधण्याचे प्रात्यक्षिक दाखविताना डॉ. नवनीत श्रॉफ)