शहरातील १५३ बेकायदा व्यावसायिक नळ जोडण्या महानगरपालिकेकडून खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 05:08 PM2019-06-27T17:08:19+5:302019-06-27T17:18:12+5:30

मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी मोजक्याच अधिकाऱ्यांसोबत एक गोपनीय बैठक घेतली.

153 illegal commercial faucet connections in the city are disrupted by the corporation | शहरातील १५३ बेकायदा व्यावसायिक नळ जोडण्या महानगरपालिकेकडून खंडित

शहरातील १५३ बेकायदा व्यावसायिक नळ जोडण्या महानगरपालिकेकडून खंडित

googlenewsNext
ठळक मुद्देदहा एमएलडी पाणी वाढणारअनेक नळ कनेक्शन अशा छुप्या पद्धतीने घेतले होते

औरंगाबाद : महापालिका प्रशासनाने बुधवारी सकाळपासून अचानक अनधिकृत व्यावसायिक नळ कनेक्शन कापण्याची मोहीम सुरू केली. शहराच्या वेगवेगळ्या भागात सहा पथकांकडून मोठ्या पोलीस बंदोबस्तात कारवाईला सुरुवात झाली. वेदांतनगर येथे कारवाईला सौम्य विरोध झाला. मध्यवर्ती जकात नाका येथे एमआयएम पक्षाने अवैध नळ कनेक्शनला पाठिंबा दर्शवीत मनपा अधिकाऱ्यांवर थेट जातीयवादाचा आरोप केला. त्यामुळे तीन तास मोहीम ठप्प पडली. दिवसभरात मनपाने १५३ पेक्षा अधिक व्यावसायिक नळ कनेक्शन खंडित केले.

महापालिकेच्या मुख्य जलवाहिनीवरून नळ कनेक्शन घेता येत नाही. मागील पंधरा ते वीस वर्षांमध्ये मुख्य जलवाहिन्यांची नागरिक, व्यावसायिकांनी अक्षरश: चाळणी करून ठेवली आहे. त्यामुळे सर्वसामाान्य नागरिकांना पाणीच मिळत नाही. मोठमोठ्या व्यावसायिकांनी तब्बल दोन इंचांपर्यंत अनधिकृत नळ घेतल्याची धक्कादायक बाब आज समोर आली. मंगळवारी रात्री मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी मोजक्याच अधिकाऱ्यांसोबत एक गोपनीय बैठक घेतली. या बैठकीत बुधवारपासून अनधिकृत असलेले व्यावसायिकनळ कनेक्शन खंडित करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. बैठकीत पथक स्थापन करण्यात आले. पथकप्रमुखासोबत कोणकोणते कर्मचारी राहतील याचीही निवड करण्यात आली. मनपाचे माजी सैनिक, पोलीस बंदोबस्तही घेण्याचे ठरले. बुधवारी सकाळी ९ वाजेपासून मोहिमेला सुरुवात करण्यात आली. वेदांतनगर, किराणा चावडी, मध्यवर्ती जकात नाका, चिकलठाणा, जालना रोड आदी भागात पथकांनी कारवाईला सुरुवात  केली. काही ठिकाणी मजुरांमार्फत खोदकाम करण्यात आले, तर काही ठिकाणी जेसीबीने मुख्य लाईन उघडी करण्यात आली. मुख्य लाईनवरील अनधिकृत व्यावसायिक नळ कनेक्शन पाहून, तर मनपा अधिकारी व कर्मचारी चकित झाले. अनेक नळ कनेक्शन अशा छुप्या पद्धतीने घेतले होते की, ते कोणाचे हे लवकर लक्षातच येत नव्हते. तब्बल दोन इंचांपर्यंतचे हे कनेक्शन होते. मुख्य जलवाहिनीची चाळणी व्यावसायिकांनी करून ठेवली होती.

मनपा अधिकाऱ्यांवर आरोप
वेदांतनगर येथे सकाळी कारवाईला सुरुवात करताच माजी महापौर तथा सभागृहनेता विकास जैन यांनी विरोध दर्शवला. मनपा अधिकाऱ्यांनी संपूर्ण शहरात मोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती दिल्यानंतर त्यांनी विरोधाची तलवार म्यान केली. दुपारी १ वाजेपर्यंत मध्यवर्ती जकात नाका येथेही मोहीम सुरळीत सुरू होती. दुपारी २ वाजता एमआयएमच्या स्थानिक नेत्यांनी मोहिमेला कडाडून विरोध दर्शवला. घटनेची माहिती मिळताच उपायुक्त मंजूषा मुथा घटनास्थळी पोहोचल्या. मध्यवर्ती जकात नाका येथे एमआयएमच्या नेत्यांनी मनपा अधिकाऱ्यांवर जातीयवादाचा आरोप केला. मोहीम जकात नाक्याहून सुरू न करता सेव्हन हिल येथून सुरू करावी, अशी मागणी केली. सायंकाळी ५ वाजता मनपा पथकाने सेव्हन हिल ते जकातनाका अशी मोहीम सुरू केली.

मनपाच्या पाण्यावर वॉशिंग सेंटर 
मुकुंदवाडी ते चिकलठाणादरम्यान मुख्य जलवाहिनीतून दोन ते तीन इंचाचे कनेक्शन घेऊन त्यावर चक्कवॉशिंग सेंटर चालविले जात असल्याचे समोर आले. या भागात चार वॉशिंग सेंटरचालकांनी अशा प्रकारे कनेक्शन घेऊन मागील अनेक वर्षांपासून मनपाच्या पाण्याचा दुरुपयोग करीत असल्याची धक्कादायक बाब समोर आली. सर्व वॉशिंग सेंटर चालकांचे अवैध कनेक्शन तोडून पंचनामे करण्यात आले. मोतीकारंजा येथे दीड इंचाच्या अनधिकृत नळ कनेक्शनच्या माध्यमातून टँकरसाठी पाणी विकले जात होते. आता त्यांच्यावर पोलिसात फौजदारी स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे उपायुक्त मंजूषा मुथा यांनी सांगितले. गुरुवारीही मोहीम सुरू राहणार असून, सहा पथकांमध्ये एकूण १०० कर्मचारी असल्याचे त्यांनी नमूद केले.

दहा एमएलडी पाणी वाढणार
शहरात पिण्याच्या पाण्याची मोठ्या प्रमाणात चोरी करण्यात येते. अनधिकृत नळ कनेक्शन घेणाऱ्या व्यावसायिकांसह सर्वसामान्य नागरिकांनाही मनपाने अनेकदा संधी दिली. नळ अधिकृत करण्यासाठी कोणीच आले नाही. आता पाण्याची चोरी करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. १ जुलैपासून मनपाचे सर्व सहा पथक घरगुती अनधिकृत नळ कनेक्शन खंडित करणार आहेत. शहरातील मुख्य जलवाहिन्यांवरील नळ कनेक्शन कापल्यामुळे शहरात किमान १० एमएलडी पाणी वाढेल, अशी अपेक्षा प्रशासनाला आहे.

अधिकाऱ्यांवर स्वतंत्र जबाबदारी
उपअभियंता आय.बी. खाजा, संधा, के.एम. फालक यांच्याकडे दोन दोन पथकांची जबाबदारी देण्यात आली होती, तर समन्वय अधिकारी म्हणून नंदकिशोर भोंबे, करण चव्हाण, विजया घाडगे, डी.के. पंडित, ए.बी. देशमुख, विक्रम दराडे यांची नियुक्ती करण्यात आली होती. पथक प्रमुख म्हणून कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे आणि एम.जी. काझी यांना नेमण्यात आले होते. या सर्वांवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपायुक्त मंजूषा मुथा यांची नियुक्ती करण्यात आली होती. प्रत्येक पथकाबरोबर एक जेसीबी, एक ट्रॅक्टर, पाच ते सहा महापालिकेचे कर्मचारी, संबंधित पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी देण्यात आले होते. 

या व्यावसायिकांचे पाणी कापले
रेल्वेस्टेशन रोडवरील हॉटेल विट्स, गोल्डी चित्रपटगृह, हॉटेल प्रीतम, हॉटेल तिरुपती, नॉव्हेल्टी लॉजिंग, लालाजी रेस्टॉरंट, हॉटेल न्यू भारती, जालना रोडवर साजन सरिता, बग्गा इंटरनॅशनल, पाटीदार भवन, राज हॉटेल, अमरप्रीत हॉटेल, हॉटेल रॉयल पॅलेस, हॉटेल अरोरा, हॉटेल लाडली, सुमनांजली हॉस्पिटल तसेच खाराकुंआ येथे अतुल कापडिया, रवींद्र अंबेकर, अशोक दरख, पटेल, कोटुळे, भगवानदास प्लाझा, दिलीप कासलीवाल, भागचंद शेट्टी, राजेश घुबडे, भगवान सिकची यांचे नळ कापण्यात आले. जकात नाक्यावर मोनालिका स्टील, गोल्डन हॉटेल आदींवर कारवाई केली.

Web Title: 153 illegal commercial faucet connections in the city are disrupted by the corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.