विद्यापीठाच्या परीक्षांमध्ये १५५५ ‘नकलाकार’ विद्यार्थी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 11:42 PM2019-07-03T23:42:09+5:302019-07-03T23:42:36+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या घेतलेल्या परीक्षांमध्ये तब्बल १५५५ विद्यार्थ्यांना परीक्षेत नकला (कॉपी) करताना रंगेहात पकडण्यात आले आहे. या नकलाकार विद्यार्थ्यांवर कारवाई करण्याची प्रक्रिया परीक्षा विभागाने सुरू केल्याची माहिती परीक्षा संचालक डॉ. गणेश मंझा यांनी दिली.
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या घेतलेल्या परीक्षांमध्ये तब्बल १५५५ विद्यार्थ्यांना परीक्षेत नकला (कॉपी) करताना रंगेहात पकडण्यात आले आहे. या नकलाकार विद्यार्थ्यांवर कारवाई करण्याची प्रक्रिया परीक्षा विभागाने सुरू केल्याची माहिती परीक्षा संचालक डॉ. गणेश मंझा यांनी दिली.
विद्यापीठाच्या पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षांना एप्रिल महिन्यात सुरुवात झाली होती. विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा १५ जूनपर्यंत सुरू होत्या. या परीक्षेच्या कालावधीत भरारी पथकांनी केलेल्या कारवाईची आकडेवारी समोर आली आहे. परीक्षेदरम्यान तब्बल १५५५ विद्यार्थ्यांना नकला करताना पकडण्यात आले. यातील काही विद्यार्थ्यांचे मोबाईलही जप्त केले आहेत. कारवाई केलेल्या परीक्षा केंद्रांवरून परीक्षा विभागाकडे बंद लिफाफ्यात त्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका पाठविण्यात आल्या होत्या. हे लिफाफे फोडल्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांकडे नकला केल्याच्या प्रकरणी खुलासा मागविण्यासाठी पत्रे पाठविण्यात आली आहेत. सर्व विद्यार्थ्यांचे खुलासे मिळाल्यानंतर संबंधित नकालाचा प्रकार आणि खुलासे एका समितीसमोर मांडण्यात येतील. त्यानंतर विद्यार्थ्यांवर कारवाईचा निर्णय घेण्यात येणार आहे. या १५५५ विद्यार्थ्यांमध्ये बी. ए. अभ्यासक्रमाचे ५०१ विद्यार्थी, बी.एस्सी.३९०, बी.कॉम. २०५, एम. ए. ९५, एम.एस्सी. ५७, एम.कॉम. ५६, बीसीएस ६३, बीबीए ३५, व्यावसायिक अभ्यासक्रम ८० आणि अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांच्या ७३ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
-----------