बालाजींची सेवा घडवितो म्हणून १५८ जणांना फसविले
By राम शिनगारे | Published: April 22, 2023 12:11 PM2023-04-22T12:11:28+5:302023-04-22T12:12:28+5:30
बेगमपुऱ्यात गुन्हा दाखल; दिलेला धनादेशही झाला अनादरीत
छत्रपती संभाजीनगर : बालाजीची सेवा घडवितो म्हणून १५८ महिला, पुरुषांकडून प्रत्येकी ३ हजार ५०० रुपये घेऊन त्यांची ५ लाख ५३ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. फसवणूक करणाऱ्या ज्ञानेश्वर निकमच्या विरोधात बेगमुपरा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविल्याची माहिती निरीक्षक विठ्ठल पोटे यांनी दिली.
वैशाली येलजाळे (रा.बेगमपुरा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सप्टेंबर २०२२ मध्ये यांना बालाजी सेवेला जालना येथील शाम विनायक जोशी (रा. समर्थनगर, जालना) हे घेऊन जात असल्याची माहिती मैत्रिणीकडून मिळाली. त्या मैत्रीणीने त्यांचा नंबरही दिला. त्यावर फोन लावल्यानंतर त्यांनी बालाजी सेवेसाठी आधारकार्ड व ३ हजार ५०० रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. वैशाली यांनी पुन्हा जोशींना फोन लावल्यानंतर त्यांनी ज्ञानेश्वर निकम याचा मोबाईल नंबर देत सर्व कामे तेच पाहत असल्याचे सांगितले. त्यानुसार १६ सप्टेंबर २०२२ रोजी निकम यास ७ जणींच्या बालाजी सेवेला जाण्यासाठी १४ हजार रुपये पाठविले. त्यानंतर फिर्यादीच्या ओळखीच्या अनेक महिलांनी बालाजी सेवेसाठी पैसे जमा केले. निकम याने १६ ऑक्टोंबर २०२२ रोजी बेगमपुऱ्यातील ब्राम्हण गल्लीतील जगदंबा मंदिर येथे महिलांची बैठकही घेतली. त्या बैठकीत त्याने सेवाकालावधींमध्ये पाळायचे नियम, प्रवासासंबंधी सूचना व तेथील वातावरणाची माहिती दिली. तोपर्यंत निकम यास ५ लाख ५३ हजार रुपये दिले होते. २४ जानेवारी रोजी निकम याने येलजाळे यांच्यामार्फत पैसे दिलेल्या केवळ ६ लोकांना सेवेसाठी बालाजीला घेऊन गेले. त्यावर विचारणा केली असता उर्वरित लोकांना १ फेब्रुवारीला नेण्याचे आश्वासन दिले. तेही निकमने पाळले नाही.
पोलिस ठाण्यात दिला साडेपाच लाखांचा धनादेश
आरोपी निकमने बालाजी सेवेला घेऊन गेलेल्या ६ लोकांना ६ फेब्रुवारी रोजी परत छत्रपती संभाजीनगरला आणले. तेव्हा बाबा पेट्रोल पंप येथे निकमला भेटण्यासाठी फिर्यादीसह काही महिला गेल्या. त्यांना तेथे उडवाउडवीची उत्तरे मिळाल्यामुळे निकमला पकडून बेगमपुरा ठाण्यात आणले. त्याठिकाणी त्याने ५ लाख ५३ हजारांचा धनादेश फिर्यादीला दिला. त्यामुळे तेव्हा त्यास सोडून दिले. त्यानंतर हा धनादेश वटण्यासाठी बँकेत टाकल्यानंतर अनादरित झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास सहायक निरीक्षक हरेश्वर घुगे करीत आहेत.