रस्ते कामांत १६ कोटींचा गैरव्यवहार प्रकरण ‘एसीबी’कडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 08:21 PM2018-05-19T20:21:06+5:302018-05-19T20:21:34+5:30
पैठण तालुक्यातील तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत १६ कोटी रुपयांच्या रस्ते कामांत गैरव्यवहार केल्याचे प्रकरण आता चौकशीसाठी अॅन्टीकरप्शन ब्युरो (एसीबी) कडे वर्ग करण्यात आले आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण यांनी दिली.
औरंगाबाद : पैठण तालुक्यातील तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत १६ कोटी रुपयांच्या रस्ते कामांत गैरव्यवहार केल्याचे प्रकरण आता चौकशीसाठी अॅन्टीकरप्शन ब्युरो (एसीबी) कडे वर्ग करण्यात आले आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण यांनी दिली.
गेल्या महिन्यात शाखा अभियंता बी. बी. जायभाये, बोईनवाड आणि पठाण यांचे या कामांप्रकरणी निलंबन करण्यात आले होते. एसीबीकडे हे प्रकरण गेल्यामुळे चौकशीअंती बडे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे. पैठण तीर्थक्षेत्र प्राधिकरणासाठी शासनाने दिलेल्या २०० कोटींपैकी १६ कोटींतून करण्यात आलेल्या काँक्रिटीकरणाच्या कामांत संबंधित अभियंत्यांनी चालढकल करीत देखरेख केली. परिणामी हे रस्ते पूर्णत: उखडले. तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी सदरील कामांची पाहणी केली होती. पाच कंत्राटदारांपैकी ३ कंत्राटदारांनी केलेल्याकाँक्रीटच्या रस्त्यांना पूर्णत: तडे गेले. ही कामे निकृष्ट झाल्याप्रकरणी अधीक्षक अभियंत्यांनी शाखा अभियंत्यांवर १० ठपके ठेवले.
कामाचे सुपरव्हिजन योग्य रीतीने झाले नाही. त्या अनुषंगाने तिघांनाही कारणे दाखवा नोटीस बजावून खुलासा मागविला. अधीक्षक अभियंत्यांकडे त्या तिघांनीही नोटीसचा खुलासा केला, तो समाधानकारक नसल्यामुळे शाखा अभियंत्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. या कारवाईचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला आहे.