रेल्वेत टीसीची नोकरी लावण्याच्या आमिषाने तिघांना १६ लाखांचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:09 PM2021-03-06T16:09:53+5:302021-03-06T16:11:09+5:30
विशेष कोट्यातून तो तरुणांना रेल्वेमध्ये नोकरी लावतो, असे त्याने सांगितले आणि त्यांचा मोबाईल क्रमांक घेतला.
औरंगाबाद : रेल्वेत टीसी पदावर नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून तिघांना तब्बल १६ लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील रॅकेटविरुद्ध सिडको पोलिसांनी गुन्हा नोंदविला. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला. रॅकेटचा म्होरक्या अनिकेत कैलास कोकाटे (रा. दसवंडी, ता. राहुरी, जि. अहमदनगर), महेश कारभारी ससे (रा. ससेवाडी, अहमदनगर) आणि तीन अनोळखींचा या रॅकेटमध्ये समावेश आहे.
याविषयी सिडको पोलिसानी सांगितले की, भरत नवनाथ खेडकर हे शहरातील उर्दू शाळेत शिपाई आहेत. ते हडको एन ११ येथील नवजीवन कॉलनीत भाड्याने राहतात. जुलै २०१८ मध्ये ते पुणे येथून औरंगाबादला बसने येत होते. यावेळी त्यांच्या शेजारील आसनावर आरोपी अनिकेत बसला होता. प्रवासादरम्यान त्यांची ओळख झाली तेव्हा त्याने तो दिल्लीत रेल भवन येथे कार्यरत असल्याचे सांगितले. विशेष कोट्यातून तो तरुणांना रेल्वेमध्ये नोकरी लावतो, असे त्याने सांगितले आणि त्यांचा मोबाईल क्रमांक घेतला. यानंतर १५ दिवसांनी त्याने त्यांना कॉल करून रेल्वेमध्ये टीसी पदाची रिक्त जागांची भरती सुरू आहे. तुमच्या ओळखीचे कोणी असेल तर सांगा. मी त्यांना नोकरीला लावतो, असे सांगितले.
सुरुवातीला खेडकर यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले. मात्र त्याने पुन:पुन्हा फोन करून विश्वास संपादन केला. यानंतर त्यांनी त्यांचे नातेवाईक विशाल तुकाराम ताठे (रा. घाटनांद्रा, ता. सिल्लोड) आणि सुनील विठ्ठल नागरे यांना ही बाब सांगितली. ते दोघे स्पर्धा परीक्षेची तयारी करतात आणि बेरोजगार आहेत. यामुळे त्यांना नोकरीची प्रतीक्षा असल्याचे कोकाटेला सांगितले. कोकाटे लगेच औरंगाबादला आला आणि त्याने खेडकर आणि त्यांच्या पाहुण्याची भेट घेऊन नोकरीसाठी प्रत्येकी १० लाख रुपये लागतील, असे सांगितले. तेव्हा त्यांनी त्यांच्याकडे ऐवढे पैसे नसल्याचे सांगितल्यावर त्याने प्रत्येकी आठ लाख रुपये द्यावे लागतील असे सांगितले. त्यांनी ही रक्कम देण्याची तयारी दर्शविली. ताठे आणि नागरे यांनी प्रत्येकी चार लाख रुपये दिले. त्यांना मदत आणि उसने म्हणून तक्रारदार यांनी आठ लाख असे १६ लाख रुपये रोख आणि आरटीजीएसद्वारे आरोपीला दिले.
बनावट नियुक्तीपत्र
आरोपीने दोन्ही उमेदवारांना दिल्ली येथे बोलावून त्यांची वैद्यकीय तपासणी केली आणि त्यांना नियुक्तीपत्र दिले. त्याने वेगवेगळी कारणे सांगून सध्या रुजू होण्यास जाऊ नका असे सांगितले. नंतर ते नियुक्तीपत्र स्वतःकडे घेऊन तो पसार झाला.
धनादेश केले अनादर
आरोपीने नोकरीच्या आमिषाने गंडविल्याचे लक्षात येताच तक्रारदार यांनी त्याचे गाव गाठून पैशासाठी तगादा लावला तेव्हा त्याने दोन धनादेश दिले. ते वटले नाहीत.