मराठवाड्यातील १६ लाख नागरिकांची तहान टँकरवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2018 12:41 PM2018-06-07T12:41:41+5:302018-06-07T12:42:18+5:30
मराठवाड्यातील पिण्याच्या पाण्याचे संकट अद्याप कमी झालेले नाही. मोठ्या, मध्यम, लहान जलप्रकल्पांमध्ये १५ टक्क्यांच्या आसपास पाणी शिल्लक आहे
औरंगाबाद : मराठवाड्यातील पिण्याच्या पाण्याचे संकट अद्याप कमी झालेले नाही. मोठ्या, मध्यम, लहान जलप्रकल्पांमध्ये १५ टक्क्यांच्या आसपास पाणी शिल्लक आहे, तर १ हजारच्या आसपास टँकरने विभागातील ८०० गावांना पिण्याचे पाणी पुरविले जात आहे. १६ लाख लोकसंख्या टँकरच्या पाण्यावर अवलंंबून आहे. जून महिन्याच्या अखेरपर्यंत समाधानकारक पाऊस न झाल्यास परिस्थिती आणखी भयावह होण्याची शक्यता आहे.
सर्वाधिक पाणीटंचाई औरंगाबाद जिल्ह्यात असून, जिल्ह्यातील ५०० गावांतील सुमारे १० लाख ५० हजार नागरिकांना ६०६ च्या आसपास टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. २०१५ नंतर यावर्षीचा उन्हाळा ग्रामीण औरंगाबादला त्रासदायक ठरला आहे. जालना जिल्ह्यातील सुमारे अडीच लाख, तर परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर जिल्ह्यांत सर्व मिळून ३ लाख नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. विभागात ११ मोठे प्रकल्प आहेत. त्या प्रकल्पांत १७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. एकूण ८६७ प्रकल्पांत १५ टक्के पाणीसाठा आहे. जलप्रकल्पांतील पाण्याचे यंदा मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन झाले आहे, त्यामुळे विभागात ट़़ँकरची संख्या वाढत आहे.
औरंगाबाद सर्वाधिक तहानलेले
औरंगाबाद जिल्ह्यात गेल्या पावसाळ्यात पुरेसा पाऊस झाला नाही. औरंगाबाद शहरालगतच्या ६० गावांत १२० च्या आसपास टँकर सुरू आहेत. औरंगाबाद शहरालगतच्या दीड ते २ लाख लोकांना टँकरने पाणीपुरवठा होत असून, एमआयडीसीच्या जलकुंभांवरून ते पाणी घेतले जात आहे. पूर्ण जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई असून, जिल्हा प्रशासनाला जूनअखेरपर्यंत तारेवरची कसरत करावी लागणार आहे.