नऊ गावांतील १६ रुग्ण एकाच दिवशी कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2021 04:02 AM2021-05-23T04:02:12+5:302021-05-23T04:02:12+5:30
सोयगाव : तालुक्यातील नऊ गावांतील कोरोनाबाधित असलेल्या सोळा रुग्णांनी शनिवारी कोरोना आजारावर मात केली असून, त्यांना जरंडी कोविड केंद्रातून ...
सोयगाव : तालुक्यातील नऊ गावांतील कोरोनाबाधित असलेल्या सोळा रुग्णांनी शनिवारी कोरोना आजारावर मात केली असून, त्यांना जरंडी कोविड केंद्रातून सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे जरंडीचे कोविड केंद्र निम्म्यावर आले असल्याने आरोग्य विभागाला दिलासा मिळाला आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सोयगाव तालुक्यात बाधितांची संख्या झपाट्याने वाढली आहे; मात्र गेल्या काही दिवसांपासून बाधितांची संख्या कमी होऊ लागली असून, रिकव्हरी रेट देखील वाढू लागला आहे. शनिवारी नऊ गावांतील १६ जणांना सुटी देण्यात आली असून, सध्या जरंडीच्या केंद्रात २६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्णांची संख्या जरी कमी होत असली तरी नागरिकांनी मास्कचा वापर कायम करावा, सोशल डिस्टन्स ठेवावे, गर्दीत जाणे टाळावे, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्रीनिवास सोनवणे यांनी केले. जरंडी कोविड केंद्रात अतुल नवले, प्रिया राऊत, वर्षा शेळके, किरण पाटील, संदीप तेलंग, राहुल दांडगे यांचे पथक रुग्णांवर यशस्वी उपचार करीत आहे.
----
गावनिहाय सुटी झालेले रुग्ण : गोंदेगाव- १, गलवाडा- २, आमखेडा- २, निंबायती- २, फर्दापूर- २, वेताळवाडी- १, तोरनाळे- २, निमखेडी- २, सोयगाव- १.
गावनिहाय उपचार सुरू असलेले रुग्ण : माळेगाव- ३, निंबायती- ३, पिंपळगाव (हरे)- ५, सोयगाव- ५, वरखेडी- ३, पळसखेडा- १, तिडका- १ आणि पहुरी- २ याप्रमाणे रुग्ण उपचार घेत आहेत.