किंचित दिलासा! जायकवाडी धरणात १५ हजार ९२५ क्युसेक आवक, जलसाठ्यात दीड टक्क्याने वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2023 11:31 AM2023-09-11T11:31:42+5:302023-09-11T11:33:32+5:30
पावसाचा जोर मंदावल्याने रविवारी नाशिक जिल्ह्यातील धरण समुहातून होणारे विसर्ग घटविण्यात आले आहेत
पैठण :नाशिक जिल्ह्यातील धरण समुहातून सोडलेले पाणी शनिवारी मध्यरात्री जायकवाडी धरणात येऊन धडकले. रविवारी धरणात १५९२५ क्युसेक्स क्षमतेने आवक सुरू होती दरम्यान गेल्या २४ तासात धरणाच्या जलसाठ्यात दीड टक्का वाढ झाली असून रविवारी सायंकाळी जलसाठा ३३.८७% झाला होता.
शनिवारी मध्यरात्री पासून उर्ध्व भागातील धरणातून होणारे विसर्ग कमी करण्यात आल्याने धरणात येणारी आवक घटणार असल्याचे उपविभागीय अभियंता अशोक चव्हाण यांनी सांगितले. शुक्रवारी नाशिक जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शनिवारी तेथील धरण समुहातून मोठ्या क्षमतेने विसर्ग करण्यात आले होते. यामुळे गोदावरी नदीस पूर आला, गोदावरीच्या पुराचे पाणी शनिवारी मध्यरात्री जायकवाडी धरणात येऊन धडकले. दरम्यान, पावसाचा जोर मंदावल्याने रविवारी नाशिक जिल्ह्यातील धरण समुहातून होणारे विसर्ग घटविण्यात आले. गंगापूर धरणातून होणारा विसर्ग बंद करण्यात आला. दारणा धरणातून ११०० तर पालखेड ४३७,आळंदी २१०, कडवा ४२९ क्युसेक्स असे नाममात्र विसर्ग रविवारी सुरू होते. यामुळे नांदुर मधमेश्वर धरणातून २५००० क्युसेक्स गोदावरीत होणारा विसर्ग ४११७ क्युसेक पर्यंत घटविण्यात आला.
यामुळे गोदावरीचा पूर ओसरत असून जायकवाडी धरणात येणारी आवक घटणार आहे. रविवारी सायंकाळी ६ वा धरणात १५९२५ क्युसेक्स आवक सुरू होती. धरणाची पाणीपातळी १५०७.०६ फूट झाली असून जलसाठा ३३.८७% झाला आहे. धरणात १४७३.३४४ दलघमी एकूण जलसाठा असल्याचे धरण अभियंता विजय काकडे यांनी सांगितले.