१६ वर्षीय तरुणीची दारुड्या रिक्षाचालकाने केली छेडछाड; घाबरलेल्या मुलीने रिक्षातून उडी घेतली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2021 11:31 AM2021-08-29T11:31:26+5:302021-08-29T11:41:56+5:30
औरंगाबादमध्ये भरदुपारी घडला थरार, आरोपीला अटक
औरंगाबाद : जालना रोडवरील मोंढा नाका सिग्नलवरून रिक्षात बसलेल्या १६ वर्षीय तरुणीची दारुड्या रिक्षाचालकाने छेडछाड केली. या प्रकारामुळे घाबरलेल्या तरुणीने भरधाव रिक्षातून उडी घेतली. शनिवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास ही घटना घडली. यात मुलगी गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून गुन्हे शाखेच्या पथकाने सायंकाळी आरोपीला बेड्या ठोकल्या.
आनंद अंबादास पहुलकर (५०) असे आरोपी रिक्षाचालकाचे नाव आहे. पीडित तरुणी रक्षाबंधनासाठी मामाच्या घरी आली होती. शनिवारी क्लासला जाण्यासाठी मामाच्या मुलाने तिला मोंढा नाका येथे आणून सोडले. तेथून ती ऑटोरिक्षात बसली व रामगिरी हॉटेलजवळ जायचे असल्याचे सांगितले. यावर तो म्हणाला, तुला तेथे सोडणार नाही, दुसरीकडे घेऊन जाणार आहे. लगेच मागे वळून त्याने तरुणीच्या डाव्या हाताला पकडण्याचा प्रयत्न केला. घाबरलेल्या तरुणीने भरधाव रिक्षातून उडी घेतली. यात तिचे नाक, हनुवटी व कानाच्या पाठीमागे गंभीर दुखापत झाली.
अल्पवयीन मुलीस पळवून केला बलात्कार; तीन संशयित राहिले बाजूला, निघाला भलताच आरोपी
तरुणीने उडी टाकल्यानंतर चालकाने रिक्षा थांबवली. त्यानंतर तो तिच्याकडे चालत आला. तरुणी ‘वाचवा वाचवा’ अशी मोठ्याने ओरडत दुसरीकडे पळत सुटली. घटनास्थळी अनेक रिक्षा थांबल्या. गर्दी जमू लागल्यानंतर चालक घटनास्थळावरून रिक्षा घेऊन पळून गेला. जखमी तरुणीला एका तरुणाने मदत करीत मामाला घटनास्थळी बोलावून घेतले. यानंतर तिला खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले.
तरुणी मोंढा नाक्याकडे पळून जाऊ लागली. तेवढ्यात सायकलवर जात असलेला नीलेश सेवेकर हा तरुण तिच्या मदतीला धावून आला. त्याने तरुणीला मी तुझा भाऊ आहे. काय झाले ते सांग, असे विचारले. तरुणीने भावाचा मोबाइल नंबर दिला.