१६५ खाटा वाढून औरंगाबादचे कर्करोग रुग्णालय होणार २६५ खाटांचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 06:23 PM2018-11-21T18:23:45+5:302018-11-21T18:24:34+5:30
मराठवाड्यासह लगतच्या जिल्ह्यांतील गोरगरीब रुग्णांसाठी आशेचा किरण ठरलेल्या राज्य कर्करोग संस्थेचा दर्जाप्राप्त शासकीय कर्करोग रुग्णालयात पायाभूत सुविधा उभारणी आणि अत्याधुनिक यंत्रसामुग्रीला मंजुरी मिळाली आहे.
औरंगाबाद : मराठवाड्यासह लगतच्या जिल्ह्यांतील गोरगरीब रुग्णांसाठी आशेचा किरण ठरलेल्या राज्य कर्करोग संस्थेचा दर्जाप्राप्त शासकीय कर्करोग रुग्णालयात पायाभूत सुविधा उभारणी आणि अत्याधुनिक यंत्रसामुग्रीला मंजुरी मिळाली आहे. मार्च-२०१९ मध्ये विस्तारीकरणातील बांधकामाला सुरुवात होऊन १०० खाटांच्या या रुणालयात १६५ खाटा वाढून ते २६५ खाटावर पोहोचणार आहे. वाढीव खाटा, नव्या उपक रणांमुळे रुग्णसेवेत वाढ होईल, असे टाटा मेमोरिअल हॉस्पिटलचे अकॅडमीक प्रोजेक्टचे डीन डॉ. कैलाश शर्मा यांनी सांगितले.
शासकीय कर्करोग रुग्णालयात मंगळवारी झालेल्या बैठकीनंतर ते बोलत होते. कर्करोग रुग्णालयास राज्य कर्करोग संस्थेचा दर्जा प्राप्त झाल्याने विस्तारीकरणातील बांधकामासाठी केंद्र सरकारची मंजुरी मिळाली. याचे काम ‘एचएससीसी’ एजन्सीला देण्यात आले आहे. या एजन्सीचे प्रतिनिधी एस.के. भटणागर, जैनेश चहल यांच्यासह डॉ. कैलाश शर्मा यांनी रुग्णालय परिसराची पाहणी करून बांधकामाच्या दृष्टीने आढावा घेतला. याप्रसंगी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, शासकीय कर्करोग रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड, वास्तुविशारद ए.ए. वाघवसे, संतोष वाकाडे यांची उपस्थिती होती.
डॉ. शर्मा म्हणाले की, राज्य कर्करोग संस्थेच्या दर्जामुळे रुग्णालयास ९७ कोटी रुपये मंजूर झाले. यात विस्तारित बांधकाम, पायाभूत सुविधा आणि यंत्रसामुग्रीला मंजुरी मिळाली. यात केंद्र सरकारचा ६० आणि राज्य सरकारचा ४० टक्के निधी आहे. ३३ कोटी रुपयांच्या निधीतून पायाभूत सुविधा म्हणजे अतिरिक्त बांधकामासाठी मंजुरी प्राप्त झालेली आहे. त्यानुसार बांधकामासाठी ‘एचएससीसी’सोबत सामंजस्य करार झाला. बांधकामासह रुग्णालयास सीटी स्कॅन, एमआरआय, एक लिनॅक एक्सलेटर यंत्र, पॅथोलॉजी, मायक्रोबायोलॉजी, बायोकेमिस्ट्रीच्या प्रयोगशाळेतील अद्ययावत यंत्रसामुग्रीही प्राप्त होतील; परंतु या यंत्रसामुग्रीच्या खरेदीसाठी ‘हाफकीन’कडे प्रस्ताव प्रलंबित आहे.
राज्य शासनाच्या पातळीवर ही यंत्रसामुग्री लवकरात लवकर कशी विकत घेता येतील, यासाठी टाटा हॉस्पिटलबरोबर विचारविनिमय सुरू आहे. टाटा हॉस्पिटल हे केंद्र शासनाच्या अधीन असून, त्यांची यंत्रसामुग्री खरेदी पद्धत ही शासकीय नियमांप्रमाणे आहे. त्यामुळे शासन असा विचार करीत आहे की, शासकीय कर्करोग रुग्णालयाला लागणारी यंत्रसामुग्री टाटा मेमोरिअल हॉस्पिटलच्या धर्तीवर खरेदी केली तर योग्य होईल. यासाठी सादर केलेल्या प्रस्तावास तत्त्वत: मान्यताही प्राप्त झालेली आहे, असेही डॉ. शर्मा यांनी सांगितले. बैठकीत रुग्णालय परिसरात रक्तपेढी, धर्मशाळा आदींची उभारणी करण्याच्या दृष्टीने आढावा घेण्यात आला.
किरणोपचारात होणार वाढ
रुग्णालयात सध्या भाभा ट्रॉन यंत्राद्वारे दररोज ४० आणि लिनॅक १००, अशा एकूण १४५ रुग्णांवर किरणोपचार केले जातात. आता आणखी एका किरणोपचार यंत्राची भर पडणार असल्याने रुग्णालयाच्या क्षमतेत वाढ होणार आहे. जवळपास १६ कोटी रुपयांचे नवे लिनॅक उपकरण दाखल झाल्यानंतर रुग्णांची वेटिंग संपुष्टात येईल. टाटा हॉस्पिटलने खरेदी केलेल्या उपकरणांच्या धर्तीवरच कर्करोग रुग्णालयासाठी दर्जेदार आणि रास्त किमतीत यंत्रसामुग्री मिळतील. ती खरेदी करताना देखभाल-दुरुस्तीच्या अटीलाही प्राधान्य दिले जाईल. डिसेंबरपर्यंत अंतिम मंजुरी मिळाल्यास लवकरात लवकर खरेदी होऊन मार्च-२०१९ च्या आत यंत्रसामुग्री कार्यान्वित होईल, असा विश्वासही डॉ. शर्मा यांनी व्यक्त केला.
१८ महिन्यांत बांधकाम पूर्ण
डॉ. कैलाश शर्मा म्हणाले की, ‘एचएससीसी’ आता कामाचा डीपीआर तयार करतील. त्याचे सादरीकरण झाल्यानंतर मार्चच्या पहिल्या आठवड्यात बांधकाम सुरू होईल. सध्या १०० खाटांनी रुग्णालय सुसज्ज आहे. ४विस्तारीकरणात रुग्णालयाच्या तिसºया मजल्याचे बांधकाम झाल्यानंतर आणखी १६५ खाटांची वाढ होईल. महिला, पुरुष रुग्ण, डे केअर आणि ‘आयसीयू’साठी आवश्यक खाटांच्या दृष्टीने १८ महिन्यांत बांधकाम पूर्ण होईल, तसेच एका बंकरचेही बांधकाम होईल.
३६२ पदांचा प्रस्ताव
राज्य कर्क रोग संस्थेसाठी ३६२ पदांच्या प्रस्तावाला सचिव स्तरावर मंजुरी मिळालेली आहे. सध्या हा प्रस्ताव राज्य सरकारच्या हाय पॉवर कमिटीकडे आहे. त्यांच्याकडूनही लवकच मंजुरी प्राप्त होईल आणि रुग्णालयाच्या मनुष्यबळाचा प्रश्नही मार्गी लागेल, असे डॉ. कैलाश शर्मा म्हणाले.