अवघ्या २० मिनिटांत १६५ मोबाइल लंपास; सलग तिसऱ्या फ्रँचायझमध्ये एकाच पद्धतीने चोरी
By सुमित डोळे | Published: October 18, 2023 11:30 AM2023-10-18T11:30:07+5:302023-10-18T11:31:13+5:30
दुकानातील सायरन होता बंद; त्याच दिवशी झाली चोरी, चोरही कारमधून दुकानासमोरच राहिले उभे
छत्रपती संभाजीनगर : कारमधून आलेल्या चोरांनी अवघ्या २० मिनिटांमध्ये दुकानाचे शटर उचकटून मोबाइल शॉपीतून जवळपास १६५ मोबाइल लंपास केले. निराला बाजारमधील एसएस मोबाइल शॉपीमध्ये सोमवारी मध्यरात्री २:३० वाजता ही घटना घडली. सकाळी ११ वाजता दुकान उघडण्यासाठी आल्यानंतर ही घटना समोर आली. मोबाइलची संख्या निश्चित होत नसल्याने रात्री उशिरापर्यंत क्रांतीचौक पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
राज्यभरात शाखा असलेल्या एस. एस. मोबाइलची निराला बाजारमध्येदेखील एक शाखा आहे. सोमवारी रात्री नेहमीप्रमाणे चालक दुकान बंद करून घरी गेले होते. सकाळी ११ वाजता ते परतले असता शटरचे लॉक मधोमध उचकटलेेले आढळले. त्यांनी शटर वर करून पाहिले असता आतील मोबाइल लंपास झालेले होते. घटनेची माहिती कळताच क्रांतीचौक पाेलिस ठाण्याचे निरीक्षक संतोष पाटील, उपनिरीक्षक विकास खटके यांनी घटनास्थळी धाव घेतली.
सायरन बंद राहिला, त्याच दिवशी दुकान फुटले
एस. एस. मोबाइल शॉपीला सायरन असून, लाॅक तोडून बळजबरीने प्रवेशाचा प्रयत्न झाल्यास मोठ्याने सायरन वाजतो. परंतु, नेमका सोमवारी रात्रीच सायरन सुरू राहिला नाही. चोरांनी कार थेट त्याच दुकानासमोर आणून उभी करत अवघ्या २० मिनिटांमध्ये दुकान फोडले. दोन दिवसांपूर्वीच दुकानात मोबाइल खरेदी करून आणले होते. त्यामुळे चोरांनी दुकानाची रेकी केली असावी, असा दाट संशय पोलिसांना आहे. चोरीत आंतरराष्ट्रीय नामांकित कंपन्यांच्या महागड्या मोबाइलचा समावेश आहे.
यापूर्वी दोन ठिकाणी यांचेच दुकाने फोडले
यापूर्वी तुळजापूर व अन्य काही शहरांमध्ये एस. एस. कम्युनिकेशन श्रृंखलेचीच मोबाइल शॉपी चोरांनी फोडून लाखोंचे मोबाइल चोरून नेले. तुळजापूरमध्ये देखील माल भरल्याच्या दोन-तीन दिवसांमध्येच दुकानात कारमधून आलेल्या चोरांनीच चोरी केली होती. हा सारखा क्रम पाहून पोलिसांनाही आश्चर्य वाटले. सोमवारी रात्री चोरांनी वापरलेल्या कारच्या नंबरप्लेटवर स्प्रे मारलेला असल्याने नंबर कळू शकला नाही. दोन पथके चोरांच्या शोधासाठी रवाना झाली होती.