‘१ मूठ धान्य,१ रुपया’सहयोग, उदगीरच्या १६ व्या विद्रोही साहित्य संमेलनाध्यक्षपदी गणेश विसपुते
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 12:13 PM2022-03-10T12:13:11+5:302022-03-10T12:13:47+5:30
डॉ. अंजुम कादरी या स्वागताध्यक्षपदी असून प्रथमत:च हा मान एका महिलेला मिळाला आहे.
औरंगाबाद : येत्या २३ आणि २४ एप्रिल रोजी १६ वे विद्रोही मराठीसाहित्य संमेलन उदगीर येथे आयोजित करण्यात आले आहे. अध्यक्षपदी विद्रोही कवी गणेश विसपुते यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती बुधवारी विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या अध्यक्षा प्रा. प्रतिमा परदेशी यांनी दिली. डॉ. अंजुम कादरी या स्वागताध्यक्षपदी असून प्रथमत:च हा मान एका महिलेला मिळाला आहे.
परदेशी म्हणाल्या, महात्मा जोतिबा फुले यांच्या १९ व्या शतकातील त्या पत्राला जाहीरनामा मानून आम्ही अ. भा. मराठीसाहित्य संमेलनाच्या आमने सामने विद्रोही मराठी साहित्य संमेलने सुरू केली आहेत. आतापर्यंत १५ संमेलने झाली आहेत. आता १६ वे उदगीरला होत आहे. ‘एक मूठ धान्य... एक रुपया’ या सहयोगातून हे संमेलन होईल. हल्ली अ. भा. मराठी साहित्य संमेलनांची अवस्था आपण पाहतो आहोत. उद्घाटकही येत नाहीत आणि निवड केलेले अध्यक्षही उपस्थित राहत नाहीत. या साहित्य संमेलनात कधी परशुराम तर कधी नथूराम गोडसेचे स्तोम माजवले जाते. विषमतावादी मूल्ये या साहित्य संमेलनातून पसरवली जातात. त्याला आमचा विरोध आहे.
गणेश विसपुते हे मूळचे मराठवाड्याचे असून सध्या ते पुण्यात स्थायिक झालेले आहेत. ‘सिना’, ‘धुवांधार’, ‘गजबजलेल्या रस्त्याच्या मधोमध’ व ‘आवाज नष्ट होत नाहीत’ हे त्यांचे गाजलेले काव्यसंग्रह आहेत. पत्रपरिषदेस प्रा. भारत शिरसाट, अनंत भवरे, श्रीरंग एकुरीकर, सिद्धेश्वर लांडगे आदींची उपस्थिती होती.