१७ कोटींच्या कामांची लगीनघाई
By Admin | Published: February 15, 2015 12:49 AM2015-02-15T00:49:57+5:302015-02-15T00:49:57+5:30
लातूर : मनपाच्या तिजोरीत खडखडाट असल्याची ओरड करणाऱ्या प्रशासनाने मार्च एण्डमुळे १७ कोटी रूपये मार्गी लावण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत़
लातूर : मनपाच्या तिजोरीत खडखडाट असल्याची ओरड करणाऱ्या प्रशासनाने मार्च एण्डमुळे १७ कोटी रूपये मार्गी लावण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत़ कोणत्या प्रभागात किती कामे करावयाची, याची चाचपणी सुरू असून नगरसेवकांकडून कामे मागविण्यात येत आहेत़ काँग्रेसचे बहुमत असलेल्या मनपात सत्ताधारी नगरसेवकांकडूनच पदाधिकाऱ्यांची कोंडी करण्यात येत असताना तिजोरीत धूळखात पडलेल्या निधीची विल्हेवाट लावण्यासाठी ‘कारभारी’कामाला लागले आहे़
केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनेंतर्गत लातूर महापालिकेला मिळालेल्या निधीची विल्हेवाट लावण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचा ठपका ठेऊन माजी नगराध्यक्ष लक्ष्मण कांबळे यांनी विरोधकांसह काँग्रेसमधील काही नगरसेवकांना सोबत घेऊन आयुक्तांच्या विरोधात पंधरा दिवसांपूर्वी आंदोलन केले होते़ निधी शिल्लक असतानाही तो खर्च करण्यात प्रशासनासह पदाधिकारीही अपयशी ठरल्याचा आरोप होत असताना तिजोरीत पडून असलेल्या १७ कोटींची विल्हेवाट लावण्याचे काम मनपाने हाती घेतले आहे़ त्यानुसार प्रभागनिहाय कामांची यादी तयार केली जात असून नगरसेवकांना कामे सुचविण्यासाठी सांगण्यात आले आहे़
पायाभूत विकास निधीतून ७ कोटी, दलित वस्ती सुधार योजना ३, नगरोत्थान २ कोटी ४०, दलितेत्तर १ कोटी ५० लाखांसह अन्य योजनेतील शिल्लक असलेल्या जवळपास १७ कोटी रूपयांची कामे केली जाणार आहेत़ एकाच वेळी शहरात विविध ठिकाणी कामे सुरू असल्याने प्रशासनाकडून कामावर देखरेख केली जात नसल्याची नागरिकांची ओरड आहे़ कंत्राटदारांकडून आपल्या मर्जीप्रमाणे कामे उरकली जात असल्याचेही सांगितले जात आहे़ त्यातच आता नवीन १७ कोटीची कामे निघणार असल्याने नगरसेवक जास्तीत जास्त कामे मिळवून घेण्याच्या प्रयत्नात आहेत़ विधानसभा निवडणुकीपासून कामाची ओरड करणाऱ्या नगरसेवकांना प्रभागात विकास कामांसाठी निधी मिळणार असल्याने कामांची यादी तयार करण्याचे काम केले जात आहे़ शिवाय, सत्ताधारी विरोधकांत विकास कामांवरून खडाजंगी होण्याची शक्यता आहे़ (प्रतिनिधी)