तथाकथित इंग्लंडच्या फेसबुक फ्रेंडकडून उच्च शिक्षित विवाहित महिलेला १७ लाखांचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2024 08:16 PM2024-08-17T20:16:50+5:302024-08-17T20:18:14+5:30
महागड्या भेटवस्तू पाठवण्याच्या आमिषाने फसवणूक
छत्रपती संभाजीनगर : इंग्लंडचा असल्याचे सांगून एका तोतयाने ३१ वर्षीय विवाहितेसाेबत मैत्री करून तब्बल १७ लाख ६९ हजारांचा गंडा घातला. याप्रकरणी गुरुवारी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
उच्चशिक्षित महिला सद्या समाजकल्याण विभागाच्या एका आश्रमशाळेची वसतिगृह अधीक्षक आहे. ऑगस्ट २०२३ मध्ये तिला विलियम्स माईकी नावाने फ्रेंड रिक्वेस्ट आली होती. ती स्वीकारताच त्यांच्यात संवाद सुरू झाला. मोबाइल क्रमांकाची देवाणघेवाण झाली. इंग्लंडच्या तोतया तरुणाने महिलेचा विश्वास जिंकून भेटवस्तू पाठवण्याचे नाटक केले. व्हॉट्सॲपवर व्हिडीओ कॉल करून दोन आयफोन, सोने, हिऱ्याचे दागिने, महागड्या चपला अशा वस्तू दाखवल्या. ३५ हजार रुपये भरून या वस्तू सोडवून घेण्यास सांगितले. त्यानुसार महिलेने रक्कम भरली. मात्र, त्यानंतर तिला विविध कारणांखाली ब्लॅकमेल करून पैसे उकळण्यास सुरुवात झाली.
सोने गहाण ठेवून दिले पैसे
महिलेकडून पैसे मिळण्यास सुरुवात होताच सायबर गुन्हेगारांनी ब्लॅकमेलिंगसाठी विविध मार्ग अवलंबण्यास सुरुवात केली. पोलिस चौकशीचे कारण सांगितल्याने महिलेने सोन्याचे दागिने गहाण ठेवून १ लाख ५० हजार रुपये कर्ज घेऊन पाठवले. पुढे वडील, बहिणीचे दागिने गहाण ठेवून कर्ज घेत ९ लाख रुपये पाठवले. भेटवस्तूंमध्ये इंग्लंडचे ५० हजार पाउंड असून, भारतात त्यासाठी ५ लाखांचा कर भरण्यास सांगून पुन्हा ५ लाख उकळले. महिला त्यांना वारंवार भेटवस्तूंची मागणी करत होती. मात्र, आरोपींनी विविध कारणे सांगून तिला टाळले. तोपर्यंत महिलेने त्यांना १७ लाख ६९ हजार रुपये पाठवले होते. पतीला हा प्रकार सांगितल्यानंतर फसवणूक झाल्याचे समजले. निरीक्षक राजेश यादव यांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला. तपास उपनिरीक्षक रेशीम कोळेकर करत आहेत.